झारखंडमधील 170 वर्षे जुन्या मंदिरात मुलगी होण्यासाठी करतात नवस

आजही अनेकांना वंशाचा दिवा हवा असतो. मुलाच्या हव्यासापोटी स्त्रीभ्रूणहत्येच्या घटनाही घडत आहेत. मात्र, आता अनेक कुटुंबाना मुलीचे महत्त्व समजत असून मुलगी खऱ्या अर्थाने वंशाचे नाव उंचावते, याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. तर मुलीमध्ये असलेल्या अनेक गुणांमुळे अनेकांना आपल्याला मुलगी व्हावी अशी इच्छा असते. मुलगा होण्यासाठी नवस करण्यासाठी अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहे. मात्र, झारखंडमध्ये देवीचे 170 वर्षे जुने मंदिर आहे. या मंदिरात मुलगी होण्यासाठी नवस करायला मोठ्या संख्येने भाविक येतात.

झारखंडमधील बोकारा जिल्ह्यातील चाकुलिया गावात 170 वर्षे जुने दुर्गा मातेचे मंदिर आहे. या मंदिरात येणाऱ्यांची कन्यारत्न होण्याची इच्छा देवी पूर्ण करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नवरात्रात या मंदिरात देवीच्या दर्शनाला विशेष महत्त्व आहे. घटस्थापनेपासून दुर्गापूजेला सुरुवात होते. मंदिरात 150 वर्षे जुना तांब्याचा घट आहे. त्याचीच घटस्थापना करण्यात येते. त्यामुळे या घटस्थापनेला महत्त्व आहे.

गावातील कालिचरण दुबे नावाच्या एका भाविकाने 150 वर्षांपूर्वी मंदिरात आपल्याला मुलगी व्हावी, यासाठी प्रार्थना केली होती. त्याची इच्छा पूर्ण झाल्यावर ही कथा सर्वत्र पसरली आणि मोठ्या संख्येने भाविक मंदिरात येऊ लागले, असे ग्रामस्थांनी सांगितले. येथे येणाऱ्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते, अशीही मान्यता आहे. त्यामुळे मंदिरात नेहमी भाविकांची गर्दी असते. तसेच इच्छा पूर्ण होत असल्याने काहीजण नसवही करतात. त्यानंतर तो पूर्ण करण्यासाठीही काहीजण येतात.

गावातील अनेकांना देवीच्या आशिर्वादानेच मुली झाल्या आहेत, असे सांगण्यात येते. काहीजण मनोकामना पूर्ण झाल्याने दरवर्षी दर्शनाला येतात. हे मंदिर सुमारे 170 वर्षे जुने आहे. तर कालीचरण या भाविकाची सांगण्यात येणारी कथा 150 वर्षापूर्वीची आहे. तेव्हापासून या मंदिरात मुलगी होण्यासाठी नवस करण्याची परंपरा असल्याचे सांगण्यात आले.

कोरोनाच्या साथीमुळे यंदा मंदिरात साधेपणाने नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाचे संकट टळल्यानंतर भाविकांना देवीचे दर्शन करता येणार आहे. सध्या पुजारी आणि काही ग्रामस्थांची उपस्थितीत नवरात्रीची पूजा करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या