ड्रग्ज घेतल्याच्या आरोपाखाली अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याला बंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिद्धांतसह एकूण 6 जणांची ड्रग्ज चाचणी करण्यात आली. यात या सर्वांनी ड्रग्स घेतल्याचे आढळून आले आहे. रविवारी रात्री बंगळुरूच्या एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. या पार्टीमध्ये अंमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी सिध्दांतसह 6 जणांना ताब्यात घेतले आहे.

बंगळुरूच्या एमजी रोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये श्रद्धा कपूरच्या भावासह अनेक जण पार्टी करत होते. पोलिसांनी याच पार्टीवर छापा टाकून श्रद्धा कपूरच्या भावासह अनेकांना ताब्यात घेतले. या पार्टीत सहभागी असणाऱ्या एकूण 35 लोकांचे नमुने पोलिसांनी चाचणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 6 जण ड्रग्स चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत. हे लोक ड्रग्ज घेऊन पार्टीत पोहोचले होते की हॉटेलमध्ये येऊन ड्रग्स घेतले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मागील काही काळात ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांची नावे समोर आली आहेत. शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूरबद्दल सांगायचे तर, त्याने चित्रपटांमध्येही आपले नशीब आजमावले आहे, परंतु त्याला यश आले नाही. बॉलीवूड चित्रपटांमध्ये सिद्धांत हा फ्लॉप हिरो राहिला. सिद्धांतने काही वेब सीरीज आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. सिद्धांतने हसीना पारकर चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत काम केले होते.