
>> रविप्रकाश कुलकर्णी
चित्रपटसृष्टी ही महासागरासारखी आहे. वरवर प्रकाशमान दिसणाऱया गोष्टीमागच्या अंधारात काय काय लपलंय, काय काय घडलंय हे सांगणं कठीण. त्याची फिकीर ना चित्रपटकर्त्यांनी केली ना इतिहासकारांनी. एक काळ तर असा होता की, चित्रपटगृहात एखादा सिनेमा लागला, त्याचे फलक वा बॅनर झळकले की, त्या सिनेमाचं आयुष्य सुरू व्हायचं आणि तो कालावधी एक खेळापासून ते 25-50 आठवडय़ांपर्यंत कितीही असायचा. जोपर्यंत सर्व मायबाप प्रेक्षकांचा पाठिंबा असायचा तोपर्यंत सिनेमा चालायचा. त्यांनी पाठ फिरवली की, तो सिनेमा जाऊन दुसरा सिनेमा लागायचा. त्या आधीच्या सिनेमाचं काय झालं याचं सोयरसुतक ना त्यांच्या निर्मात्यांना असायचं ना प्रेक्षकांना.
यातलीच एक गोष्ट, सिनेमाची बॅनर आणि ठिकठिका णी लागणाऱया पोस्टर्सची. त्या पोस्टर्सची एक रंगीबेरंगी दुनिया होती आणि ते करणारे चित्रकार कलावंतच होते. ते सिनेमे गेले, ती पोस्टर्स गेली. त्याबरोबर त्यांची ती कामगिरीदेखील गेली. पण आता काळ बदलला आहे. सिनेमा ही अभ्यासाचा गोष्ट झाली आहे. सिनेमाच्या अनेक पैलूंचा अभ्यास होऊ लागला आहे. त्यासंबंधातल्या पूर्वसुरींचा शोध घेऊन अभ्यासपूर्ण लेखन होऊ लागलं आहे. त्यावरची पुस्तकंदेखील प्रकाशित होताना दिसत आहेत. अशापैकी एक म्हणजे सुबोध गुरुजी यांनी लिहिलेलं आणि अनुबंध प्रकाशनने प्रकाशित केलेलं ‘पाऊलखुणा’ हे पुस्तक! 1924 ते 1989 दरम्यान आलेल्या चित्रपटांच्या हाताने काढलेल्या निवडक पोस्टर्सचा आणि ती रंगवलेल्या कलावंतांचा मागोवा त्यात घेतलेला दिसतो. विशेष म्हणजे मराठीबरोबर ही सर्व माहिती इथे इंग्रजीमध्येही आहे. ‘हिस्टरी ऑफ हँडपेंटेड पोस्टर डिझाईन्स अर्थात पाऊलखुणा’ हे यातला नेमका विषय स्पष्ट करतो.
सुबोध गुरुजी मूकपटाच्या निर्मितीला बारा वर्षे झाल्यानंतर म्हणजे 1924 मधली आपली निरीक्षण नोंदवतात. पहिलं पोस्टर हाताने चित्रांकित करून छापलं गेलं ते ओगलेवाडी या लहानशा गावात. मूकपट ‘कल्याण खजिना’ चित्रकर्त्याचं नाव आहे खरे वा खिरे. छपाई एस. बी. लथो, ओगलेवाडी. 1933 ते 1995 पर्यंतच्या निवडक चित्रपट कंपन्या आणि त्यांच्याकडे पोस्टर्स करणारे कलावंत यांची माहिती आणि त्यांनी केलेली रंगीत पोस्टर्सचे फोटो दिल्यामुळे वाचकांना स्मरणरंजनाचा अनुभव येतो.
एस. एम. पंडित यांच्याबद्दल सुबोध गुरुजी लिहितात, 1938 साली बॉम्बे टॉकीजच्या ‘भाभी’ चित्रपटाचे त्यांनी केलेले पोस्टर पाहून फिल्म इंडियाच्या बाबुराव पटेल यांनी त्यांना फिल्म इंडियाचे मुखपृष्ठ कायमस्वरूपी करण्याच्या कराराने नियुक्त केले. 1938 ते 1959 या दरम्यान फिल्म इंडियाची अप्रतिम कव्हर्स एस. एम. पंडित यांनी केलेली आहेत. त्यांनी केलेल्या चित्रात रघुवीर मुळगावकर, बारस्कर, पद्मराज अशांचा सहभाग असेल तर ते चित्रावर ‘स्टुडिओ एस.एम.पंडित’ असा उल्लेख करत असत. रंगसम्राट रघुवीर मुळगावकर यांची मोजकीच पोस्टर्स येथे आहेत. ती त्यांच्या नेहमीच्या धाटणीपेक्षा वेगळी आहेत. वसंत गोविंद परचुरे चित्रांकन करत आणि विष्णू मायदेव सुलेखन करत. त्या दोघांची, पामार्ट संस्थेची माहिती विशेष वाटते. नायक वा नायिकेचा चेहरा वा शरीराकृती ठसठशीत मोठी ठेवण्याची रचना हा त्यांच्या चित्रातला विशेष होता.
दिवाकर करकरे, रामकुमार शर्मा, ‘मुगले आझम’मुळे विख्यात झालेले जी. कांबळे, सत्यजित राय यांची आणि त्यांनी केलेल्या पोस्टर्सची येथे दखल घेतलेली आहे. प्रभात चित्रपट कंपनीच्या गाजलेल्या चित्रपटांची पोस्टर्स जिवाजी भिवाजी दीक्षित यांनी केलेली आहेत. त्यांना त्याचे श्रेय देताना गुरुजी यांनी चुकून वेगळीच आद्याक्षरे दिलेली आहेत.
चित्रपट अभ्यासक योगेश्वर गंधे आणि अशोक राणे यांनी या पुस्तकाचं नेमकेपणाने महत्त्व सांगितलेलं आहे. बांधकाम क्षेत्रातील पिनाकल ग्रुपचे गजेंद्र पवार यांनी या पुस्तकासाठी मदत केलेली आहे. गजेंद्र पवार हा अवलिया आज हजारो कोटींचा व्यवसाय लीलया करत असला तरी 25 वर्षांपूर्वी गरिबीतून धडपडत पडेल तो व्यवसाय करत पुढे आला. तो काळ नव्या सिनेमाचे पोस्टर रातोरात भिंतीवर चिकटवण्याचा. हेहे सारे जीपीने केले. या सगळ्या गोष्टींनी त्यांना ऊर्जा मिळाली. त्याचीच जाण सिनेमा पोस्टर्सच्या पुस्तक प्रकाशनला मदत करण्यामागे आहे हे मुद्दाम नमूद केले पाहिजे. अशा या रंगीत चित्रदर्शी पोस्टर्सचे मराठीतल्या पहिल्या पुस्तकाचे स्वागत केले पाहिजे.


























































