
यंदाच्या टेनिस मोसमाला विजेतेपदाने सुरुवात केल्यानंतर रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन ही हिंदुस्थानी जोडी आता पुण्यात टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेतील विजेतेपदासाठी उत्सुक आहेत. रामकुमारची ऊर्जा आणि सर्वोत्तम टेनिस खेळण्यासाठी असलेली त्याची उत्कंठा यामुळे पुण्यात आणखी एक आठवडा चांगला जाईल, असा विश्वास यापूर्वी जागतिक क्रमकारीत तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारलेल्या रोहन बोपण्णाने सांगितले. बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टकर सोमवारपासून सुरू झालेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेसाठी ही जोडी सज्ज झाली आहे. अनुभवी रोहन बोपण्णा म्हणाला, ‘रामकुमारला मी खेळाडू म्हणून घडताना पाहिले आहे. डेक्हिस करंडक स्पर्धा असो किंवा अन्य कुठली स्पर्धा त्याला मी नेहमीच सल्ला देत आलो आहे. त्याला कुठे सुधारण्याची संधी आहे हे मी त्याला नेहमी समजावून सांगितले. कोर्टबाहेर आणि कोर्टवर दोन्ही ठिकाणी मी त्याला चांगला ओळखतो. त्याच्यातील समजदार वृत्तीमुळे आमच्यात चांगले संबंध निर्माण झाले आणि त्यामुळे चांगले काम करण्यात मदत झाली, असे बोपण्णा म्हणाला.

























































