सराईत मोबाईल चोर गजाआड, धूम स्टाईलने करायचे चोऱ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘धूम’ स्टाईलने मोटरसायकल चालवून नागरिकांचे मोबाईल चोरणाऱया दोघांना बोरिवली पोलिसांनी अटक केली. आरिफ मोहम्मद युसुफ शेख आणि इरफान ऊर्फ बजरंगी अक्रम खान अशी त्या दोघांची नावे असून ते सराईत चोरटे आहेत.

तक्रारदार हे बोरिवली येथे राहतात. 9 मे रोजी ते बोरिवली येथून जात होते तेव्हा मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांचा मोबाईल चोरून पळ काढला. मोबाईल चोरीप्रकरणी त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक विजय माडये, उपनिरीक्षक इंद्रजित पाटील आणि पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका फुटेजमध्ये इरफान दिसला. त्यावरून तपासाची चक्रे फिरली. पोलिसांनी इरफानची माहिती काढली. तो हैदराबाद येथे असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांचे पथक हैदराबाद येथे गेले. इरफानने त्याचा मोबाईल बंद करून ठेवला होता. त्यामुळे त्याला शोधताना पोलिसांना अडचणी येत होत्या. अखेर पोलिसांनी हैदराबादच्या ओल्ड घास मंडी येथून इरफान आणि आरिफला ताब्यात घेतले. त्या दोघांची चौकशी केली. कसून चौकशी केल्यावर त्या दोघांनी चोरीची पोलिसांना कबुली दिली. पोलिसांनी त्या दोघांकडून चोरीचा मोबाईल आणि मोटरसायकल हस्तगत केली आहे. आरिफविरोधात खार तर इरफानविरोधात सात पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.