ब्राझील गटात अव्वल, सर्बियाकर मात करून बाद फेरीत धडक

24

सामना ऑनलाईन । मॉस्को

संभाव्य जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या ब्राझीलने विश्वचषक स्पर्धेत अखेर बाद फेरीचे तिकीट पक्के केले. ‘ई’ गटातील अखेरच्या सामन्यात ब्राझीलने सर्बियावर २-० ने मात करत सलग नवव्यांदा नॉकआऊट फेरी गाठत गटात अव्वल क्रमांक पटकावला. ब्राझीलकडून पॉलिन्हो आणि थिएगो सिल्वाने शानदार गोल केले. आता बाद फेरीत ब्राझील आणि मेक्सिको २ जुलैला भिडतील.

नेमारसाठी खास रणनीती
या महत्त्वाच्या सामन्यात ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमारला प्रतिस्पर्ध्यांकडून लक्ष्य केले जाणार याची खात्री असल्याने ब्राझीलचे प्रशिक्षक टीटो यांनी त्याला थेट शूट करण्याच्या भूमिकेऐवजी सहयोगी भूमिका दिली. संपूर्ण सामन्यात नेमार पास करताना दिसत होता. ब्राझीलचा दुसरा गोल नेमारच्या कॉर्नर किकवर झालेला दिसला.

पॉलिन्होने खाते उघडले
कॉटिन्होच्या पासकर पॉलिन्होने गोलक्षेत्राच्या बाहेरून सर्बियन बचावफळी भेदत गोलक्षेत्रात प्रवेश केला. सर्बियन गोलकीपर व्लादिमीर स्टोकोविचने पॉलिन्होला रोखण्याच्या प्रयत्न केला, मात्र पॉलिन्होने त्याच्या डोक्यावरून चेंडू आरामात गोलजाळ्यात घालत ब्राझीलला १-० ने आघाडी मिळवून दिली.

सिल्वाच्या गोलने निर्णायक आघाडी
सामन्याच्या ६८ व्या मिनिटाला नेयमारच्या कॉर्नर किकवर सज्ज असलेल्या सिल्वाने हेडरद्वारा गोल करत ब्राझीलची आघाडी २-० ने वाढवली. यानंतर ब्राझीलने बचावावर भर देत सर्बियन आक्रमणाला संधी दिली नाही. या गटातून ब्राझीलसह स्वित्झर्लंडनेही बाद फेरीत धडक मारली आहे.

एलिसनचा शानदार बचाव
मध्यंतरानंतर सर्बियाने आक्रमक धोरण स्वीकारत गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. ६१ व्या मिनिटाला सर्बियाकडे बरोबरी साधण्याची नामी संधी होती, मात्र ब्राझीलचा गोलरक्षक एलिसनने शानदार बचाव करत सर्बियन आघाडीचा प्रयत्न हाणून पाडला.

आपली प्रतिक्रिया द्या