ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अवघ्या 45 दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मी जी आश्वासने दिली होती ती सध्याच्या स्थितीमध्ये पूर्ण करू शकले नाही. आम्ही करकपातीचे स्वप्न पाहिले होते, मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया रचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वर्तमानात ते शक्य नसल्याने राजीनामा देत असल्याचे लिझ ट्रस यांनी म्हटले आहे.

हिंदुस्थानी वंशाचे ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवडून आल्या होत्या. त्यांनी ब्रिटनचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्याच्या कन्झर्वेटीव्ह पक्षात फूट पडली आहे. पक्षांतर्गत बंडखोरांकडून ट्रस यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू होती. आठवडाभरापासून प्रचंड दबावाचा सामना करणाऱया लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा अखेर राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी, ब्रिटनचे गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी बुधवारी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री क्वासी यांनीही राजीनामा दिला होता.

पंतप्रधानपदासाठी ऋषी सुनक यांचे नाव चर्चेत

लिझ ट्रस यांनी राजीनामा दिल्याने आता पंतप्रधान कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिंदुस्थानी वंशाचे खासदार ऋषी सुनक, ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन, पेनी मॉर्डंट यांची नावे पंतप्रधान पदासाठी चर्चेत आहेत. ऋषी सुनक यांचा दावा अधिक भक्कम असल्याचे बोलले जात आहे.