
एखाद्या मुलीला आयटम असं म्हणून बोलवणं एखाद्या लैंगिक शोषणाहून कमी नाही, असं म्हणत पोक्सो न्यायालयाने एका आरोपीला दीड वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. एका 16 वर्षांच्या मुलीवर अश्लील टिप्पणी करण्याच्या आरोपाखाली ही शिक्षा ठोठावण्यात आली.
ही घटना 2015 मधील आहे. पीडिता शाळेतून घरी जात होती. तेव्हा वाटेत या तरुणाने तिचे केस ओढून तिला आयटम असं संबोधलं होतं. या प्रकरणी आपल्याला चुकीच्या आरोपांखाली अडकवलं गेल्याचा आरोप आरोपीने केला होता. कारण, पीडितेच्या पालकांना त्यांची मैत्री मान्य नव्हती, असं आरोपीतर्फे सांगण्यात आलं होतं
मात्र, न्यायालयाने या कृतीला लैंगिक शोषण असं मानलं आहे. आरोपीने या घटनेपूर्वी एक महिना आधीपासून पीडितेचा पाठलाग केला होता. तसंच आरोपीने केलेला मैत्रीचा युक्तिवाद पीडितेने आपल्या जबाबात किंवा आरोपीच्या वकिलांनी युक्तिवादात असं कुठेही म्हटलेलं नाही. शिवाय कोणत्याही साक्षीदारानेही तसा उल्लेख केलेला नाही, असंही निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं.
या प्रकरणी आरोपीला जामीन देण्यास नकार देताना विशेष पोक्सो न्यायाधीश एस. जे. अन्सारी म्हणाले की, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. महिलांसोबत अशा प्रकारची वागणूक रोखण्यासाठी रोडसाईड रोमियोंना शिक्षा होणं गरजेचं आहे, असं म्हणत न्यायालयाने आरोपीला दीड वर्षांची शिक्षा ठोठावली.


























































