उमेदवाराने भरली 25 हजारांची चिल्लर; निवडणूक अधिकाऱयांच्या तोंडाला आला फेस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

 लोकसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी वेगवेगवेगळे फंडे वापरले. कुणी रोड शो काढत मिरवणुकीने तर कुणी आधी होमहवन करून देवा-ब्राह्मणांचे आशीर्वाद घेत उमेदवारी अर्ज भरले. चेन्नईत एका अपक्ष उमेदवाराने तर चक्क 25 हजारांची चिल्लर भरून निवडणूक अधिकाऱयांच्या तोंडाला फेस आणला.

पश्चिम बंगालच्या जाधवपूर मतदारसंघाचे भाजप उमेदवार  अनुपम हाजरा यांनी  कोलकाता येथील मंदिरात होमहवन करीत पुजाऱयांचे आशीर्वाद घेतले आणि उमेदवारी अर्ज भरला. उत्तरांचलमध्ये गढवाल मतदारसंघात काँग्रेस उमेदवार मनीष खंडुरी यांनी तुफान पावसातही समर्थकांची मोठी रॅली काढून आपले शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर खंडुरी यांनी उमेदवारी अर्ज भरला. तामीळनाडूत टीआरएस उमेदवाराने समर्थकांची प्रचंड बाईक रॅली काढून उमेदवारी भरली. उमेदवार अशाप्रकारे अजब शक्कल लढवत असल्यामुळे निवडणुक अधिकाऱयांचा वेळ नाहक वाया जात आहे.

10, 5 आणि 2 रुपयांची नाणी

तामीळनाडूच्या दक्षिण चेन्नई मतदारसंघात अपक्ष उमेदवार कृपालजी देवदास यांनी ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या मराठी चित्रपटाची आठवण करून देणारी कृती केली. त्यानी चक्क 25 हजार रुपयांची चिल्लर हंडे, कळशी आणि परातीत भरून निवडणूक अधिकारी कार्यालयात नेली. या चिल्लरीत 10, 5 आणि 2 रुपयांची नाणी मोठय़ा संख्येने होती. कृपालजी यांच्या अजब शकलीमुळे निवडणूक अधिकाऱयांना मात्र निवडणूक अनामत रक्कम मोजताना पार घाम फुटला.