जालन्यातील कल्याणी शिवारात एक एकर क्षेत्रावर गांजाची शेती; कोट्यवधी रुपयांची गांजाची झाडे जप्त

जालना जिल्ह्यातील पारध पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी गांजाच्या शितीविरोधात धडक कारवाई केली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कल्याणी शिवारातील एक एकर क्षेत्रावरील गांजाची शेती उद्ध्वस्त करून कोट्यवधी रुपयांची गांजाची झाडे जप्त केली आहेत.

भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथील एकाने कल्याणी शिवारात एक एकर शेतामध्ये गांजाची शेती केल्याची माहिती सपोनि गुसिंगे यांना मिळाली होती. त्यांनी गुरुवारी मोठ्या फौजफाट्यासह नायब तहसीलदार पप्पूलवाड, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांना सोबत घेत या शेतावर धाड टाकली. यावेळी पोलीस, तहसील आणि कृषी विभागाचे पथक एवढी मोठी गांजाची शेती पाहून अवाक झाले. पोलिसांनी खाजगी मजूर लावून या शेतातील गांजाच्या झाडांची मोजणी करून ते उपटून घेतले. त्यानंतर एका ट्रॅक्टरमधून बंदोबस्तात ही गांजा झाडे पारध पोलीस ठाण्यात नेण्यात आली आहेत. ही झाडे अंदाजे साडेपाचशे पेक्षा जास्त असून एका ओल्या झाडाचे वजन पाच ते साडेपाच किलो आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, पोलीस उपनिरीक्षक विलास गुसींगे, पोलीस उपनिरीक्षक विजय आहेर, नायब तहसीलदार पप्पुलवाड,तलाठी सोनूने, पोहेकाँ सिनकर,सरडे, खिल्लारे, गणेश पायघन, शिवाजी जाधव, नितेश खरात, संतोष
जाधव, शरद शिंदे,महिला पोकाँ. कविता बारवाल, रुपाली नरवाडे, कृष्णा गवळी व होमगार्ड तेलंग्रे, बोडखे, खरात, लोखंडे, जाधव आदींनी ही कामगिरी केली.