अटकेपासून बचावासाठी रचला स्वतःच्या मृत्यूचा बनाव, वर्तमानपत्रात बातमीही छापली; पण पुणे पोलिसांनी पकडलेच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्षभरापूर्वी कोथरुड भागातून चारचाकी इर्टीगा कार चोरून मध्यप्रदेशात पसार झालेल्या चोरट्याने अटकेपासून बचावासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. मध्यप्रदेशातील एका स्थानिक वर्तमानपत्रात त्याने नातेवाईकांमार्फत मृत्यूची बातमी छापून आणली. त्यानंतर तपासही थंडावला. मात्र, कोथरूड पोलिसांनी शिताफीने तपास करीत त्याचा हा बनाव उघड करून अखेर त्याला अटक केली.

विवेक मिश्रा (रा. महेर, जि. सतना, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. मिश्रा याचे कोथरुड भागात पंक्चरचे दुकान होते. वर्षभरापूर्वी त्याने कोथरुडमधील सुतारदरा येथून कार चोरली. चोरी करुन तो मध्यप्रदेशातील मूळगावी गेला. त्यानंतर पोलिसांच्या तावडीत सापडू नये, यासाठी नातेवाईकांमार्फत स्वत:च्या मृत्यूची बातमी एका वर्तमानपत्रात छापून आणली होती.

प्राथमिक तपासात मिश्रा याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मध्यप्रदेशातील मिश्रा याच्या मूळगावी पोलिसांचे पथक गेले होते. तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. वृतपत्रातील मृत्यूच्या बातमीचे कात्रण त्यांनी तपास पथकाला दाखविले होते. मात्र, पोलिसांच्या तपासात मिश्रा हयात असल्याची माहिती मिळाली. तो चोरी केलेली कार स्वतः वापरत असल्याचे समजले. तसेच, कारवरील नंबरप्लेट बदलून मिश्रा हा पुण्यातील कोथरूड भागात येणार असल्याची माहिती तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी, अंमलदार अजिनाथ चौधर, संजय दहिभाते यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मिश्राला ताब्यात घेतले. त्याच्याकडून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त रुक्मिणी गलांडे, कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली अजय शिर्के, विष्णू राठोड, आकाश वाल्मिकी यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.