
चाकूर तालूक्यातील मौजे जानवळ हे गाव कुत्र्यामुळे सर्वत्र प्रसिद्ध झालेले आहे. येथील पश्मी आणि कारवान ही श्वानांची जात प्रसिद्ध आहे. शिकारीसाठी म्हणून ओळखली जाणारी कारवान जात आणि राखणदारीसाठी म्हणून प्रसिद्ध असणारी पश्मी ही जात येथील नागरिकांनी ती मागील कांही शतकांपासून सांभाळलेली आहे. स्थानिक पातळीवर कांही जण येथील कारवान या कुत्र्यास बांगडी कारवान असेही म्हणतात. 10 ते 15 हजार रुपये किमान या दरापासून येथील कारवान आणि पश्मी जातींच्या श्वानांची विक्री करण्यात येते.
महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात तसेच कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, बारामती या भागात कारवान ही कृत्र्याची जात आढळते. शिकारीसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही जात आहे. चाकूर तालूक्यातील जानवळ परिसरातील नागरिकांनी कारवान ही जात मागील कांही शतकांपासून सांभाळलेली आहे. येथील कारवान जातीचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे कर्नाटक, महाराष्ट्र सीमावर्ती भागात आढळणाऱ्या किंवा बारामती, सांगली, पंढरपूर या भागात आढळणाऱ्या कारवान जातीपेक्षा येथीन कारवान जातीच्या कुत्र्याचे तोंड अधिक लांब आकाराचे आहे. स्थानिक नागरिक याला बांगडी कारवान ही म्हणतात. कारण महिलेच्या हातातील बांगडी ही या कुत्र्याच्या तोंडातून, डोळ्यापर्यंत जाते असे सांगतात. डोंगराळ प्रदेशातील ही जात अतिशय काटक आहे. सलग आठ तास विना खातापिता तो धाऊ शकतो. सशांची शिकार करण्यासाठी याचा अधिक उपयोग केला जातो. जानवळ परिसरात अधिक संख्येने तांडे आहेत त्यामुळे शिकारीसाठी म्हणून या कारवान जातीचा येथे अधिक उपयोग केला जातो. 12 ते 16 वर्षांपर्यतचे आयुष्यमान असणारी कारवान जात दुध, भाकरी खाऊनही राहते. पळण्याची क्षमता अधिक असल्यामुळे या कुत्र्याची छाती भरीव दिसते. अॅक्टोंबर ते डिसेंबर हा कालावधी प्रजनन क्षमतेचा आहे. 60 दिवसांचा वेळ असतो. एकाच वेळी 2 ते 7 पर्यंत पिल्ले कारवानची मादी देते. दीड महिन्यांपासूनच याला शिकवण्यास सुरुवात केली जाते.
कारवान कुत्र्यांना बांधून ठेवले जात नाही. दररोज किमान 3 ते 5 कि.मी. फिरवावे लागते. ऊन, वारा, थंडी, वादळातही हे अत्यंत सक्षम आहे. याची हुंगण्याची क्षमता अधिक आहे. एका तासामध्ये हे कुत्रे 12 कि.मी.धावतात. स्थानिक नागरिक कारवान ही जात स्थानिक असल्याचे सांगत असले तरी ती परदेशातील आहे. या भागात रोहिले पठाण यांचे पूर्वी वास्तव होते. त्यांच्यासोबतच कारवान आणि पश्मी श्वान हिंदु्स्थानात आलेले आहेत असेही कांही जण सांगतात.
राखणदारीसाठी प्रसिद्ध पश्मी
कारवान ही जात जशी शिकारीसाठी म्हणून ओळखली जाते त्याचप्रमाणे येथील पश्मी ही जात राखणदारीसाठी म्हणून ओळखली जाते. जानवळ पश्मी हा एकाच रंगात आढळतो. याचे आयुष्य ही 15 ते 16 वर्षाचेच आहे. 9 व्या महिन्यापासून ते 12 वर्षापर्यंत पश्मीची प्रजनन क्षमता आहे. पश्मी ही जात मुळ किरगीस्तानची असल्याचे सांगीतले जाते. तायघन ब्रीड या नावाने तिची ओळख आहे. जानवळकरांनी मात्र हे पश्मी ब्रीड सांभाळलेच नाही तर जतनही केलेले आहे. एका वेळी पश्मीचे 3 ते 7 पिल्ले मिळतात.
फार पूर्वी या परिसरात बिबट्यांचे वास्तव्य होते. जानवळ परिसरात 2 पश्मींनी थेट बिबट्याची शिकार केलेली आहे असे इथे अभिमानाने सांगीतले जाते. राखणारी करणाऱ्या पश्मी जातीच्या कृत्र्यांचे संरक्षण व्हावे म्हणून कृत्र्यांच्या गळ्यात धारदार लोखंडी खिळे असणारा पट्टा लावलेला असे. जानवळ येथे हा पट्टा आजही जतन करून ठेवलेला आढळून येतो.
जानवळ हे गाव कारवान आणि पश्मी जातींचे श्वान मिळण्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे येथील श्वान विक्रीची वार्षिक उलाढाल जवळपास 1 कोटी रुपयांची आहे. येथील सुमारे 30 ते 35 कुटूंब श्वान विक्रीच्या व्यवसायामध्ये आहेत. मात्र कांही चुकीच्या पध्दतीच्या लोकांमुळे, त्यांनी केलेल्या फसवणूकीमुळे जानवळ बदनामही झालेले आहे. सध्या येथील युवा पिढी श्वानांची देखभाल, विक्री या कडे व्यावसायिक पद्धतीने पाहात असल्याचे दिसून येत आहे. अगदी थेट डीएनए तपासणी करण्याचा मनोदयही कांही जणांनी बोलून दाखवला व त्यावर काम सुरू असल्याचे येथिल अतूल काळे यांनी सांगीतले. किमान 10 ते 15 हजार रुपयांना येथील कारवान आणि पश्मीचे पिल्लू देण्यात येते. एखाद्या व्यक्तीस नर आणि मादी असे दोन्ही हवे असेल तर एकाच आईचे पिल्लू देण्यात येत नाही. नर एका ठिकाणच्या आणि मादी एका ठिकाणची असे वेगवेगळे दिले जाते असेही यावेळी सांगण्यात आले. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या तर जानवळ येथील अनेक कुटुंबांना या व्यवसायातून आधार मिळेल असेही सांगण्यात आले.




























































