बालकामगारांना जोखमीच्या ठिकाणी कामावर ठेवणार्‍या ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल, 4 बालकामगारांची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डाळ मिलमधील धोकादायक मशिनरीच्या ठिकाणी बालकामगार म्हणून नियुक्त करून अतीश्रमाचे काम करून घेऊन मानसिक व शारीरिक शोषण करणार्‍या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 बालकामगारांची सुटका करण्यात आली.

बालकांना कामावर ठेवू नये, असा कायदा असूनही बालकांना बालमजूर म्हणून कामावर ठेवले जाते. बालमजुरी प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी बालमजूर नियमन व निर्मूलन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील विविध आस्थापनांत काम करणार्‍या बालकामगारांची माहिती घेत असताना पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीवरून अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या नेतृत्वातील पथकाने एमआयडीसी लातूर येथील कीर्ती डाळ मिलवर छापा टाकला. तेव्हा तेथे चार अल्पवयीन मुले अतिजोखमीचे काम करीत असताना सापडले. लातूर येथील खाडगाव परिसरात राहणारा अन्वर बरकत शेख याने नमूद अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून डाळ मिल मध्ये कामाला लावले, अशी माहिती दिली.

यावरून ठेकेदार अन्वर बरकत शेख रा. खाडगाव रोड लातूर याच्याविरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 655/2022 कलम 3(अ),14 बालकामगार प्रतिबंध अधिनियम 1986, तसेच 75 व 79 अल्पवयीन न्याय कायदा 2015 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही बालकामगारांची सुटका करण्यात आलेली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस उपाधीक्षक सुनील गोसावी यांच्या नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, पोलीस अंमलदार प्रकाश जाधव, सदानंद योगी, मनियार, महिला पोलीस अंमलदार वंगे, गिरी यांनी ही कारवाई केली आहे.