लातुरात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या 9 जणांविरुद्ध गुन्हे दाखल, 2 जेसीबी 2 ट्रॅक्टरसह 34 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर पोलीस ठाणे जळकोट हद्दीतील डोंगरगाव व बोरगाव येथील तिरू नदीपात्रात काही लोक बेकायदेशीर, बिगरपरवाना वाळू उत्खनन करून गौण खनिजाची चोरी करत होते. गुरुवारी रात्री 1 ते पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी उपविभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पथक बनवून धडक मोहीम राबवून बोरगाव येथील तिरू नदीपात्राच्या परिसरात छापा मारला. यात 9 जणांविरुद्ध 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत 2 जेसीबी, 2 ट्रॅक्टरसह 34 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जीवन किशन केंद्रे, वय 45 वर्ष, राहणार बोरगाव, (खुर्द) तालुका जळकोट हा तिरू नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या साह्याने नदीपात्रातील गौण खनिज वाळू उत्खननाचा करत होता. कोणताही परवाना नसताना, वाळू चोरी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक नदीपात्रात उतरून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वाळू उत्खनन करून, शासनाचा महसूल बुडवून वाळूची चोरी करत होता. वाहतूक करीत असताना चोरलेली वाळू व वाहनासह 5 लाख 5 हजार रुपयाच्या मुद्देमालासह मिळून आल्याने त्याच्यावर पोलीस ठाणे जळकोट येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 213/2022, कलम 379, 34 भारतीय दंड विधान संहिता सह 48 (7) (8) गौण खनिज कायदा 2013 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.

तसेच रात्री 3 वाजण्याच्या सुमारास डोंगरगाव शिवारात असलेल्या तिरू नदीपात्रातील वाळूचा बेकायदेशीर उपसा करीत असताना, संदीप माधव चव्हाण, राहणार सुल्लाळी तांडा, तालुका जळकोट, तुकाराम देविदास लुंगारे, राहणार मरशिवणी, तालुका कंधार. दीपक रोहिदास करडे, राहणार डोंगरगाव. सेवालाल बाबुराव जाधव, राहणार चिमेगाव तालुका औराद जिल्हा बिदर. दीपक दामोदर परगे , राहणार घोणशी तालुका जळकोट. दामोदर निवृत्ती परगे, राहणार घोणशी, तालुका जळकोट. जयप्रकाश माधव मोरे, राहणार जाम, तालुका मुखेड. माधव देश चव्हाण, राहणार सुल्लाळीतांडा, तालुका जळकोट. हे वाळूचे अवैध उत्खनन करीत असताना 2 जेसीबी, 1 ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीपात्रातील चोरलेली वाळू अशा एकूण 29 लाख 500 रुपयाच्या मुद्देमालासह मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे जळकोट येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 212/2022 कलम 379, 34 भारतीय दंड विधान संहिता सह 48 (7)(8) गौण खनिज कायदा 2013 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम, पथकामधील पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ जाधव, रोकडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर राख, पोलीस अमलदार गंगाधर शिंगडे, सिराज शेख, बाळासाहेब गडदे, सूर्यकांत कलमे, संतोष साठे, शिवाजी तोफरफे तसेच दंगल नियंत्रण पथकातील जवानांनी केली आहे.