
सीबीएसी परिक्षेसंदर्भातील एका शाळेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. या शाळेला दहावीच्या परीक्षेत एका विद्यार्थ्याला 0 मार्क देणं चांगलच भारी पडलं आहे. नुकत्याच झालेल्या या प्रकरणाची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयाने शाळेच्या हलगर्जीपणाला फटकारत 30 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या सुनावणीत न्यायालयाने बोर्डाला नवीन निकाल जाहीर करण्याचे निर्देशही दिले आहेत.
शाळेकडून एकसारखी नावे असल्यामुळे विद्यार्थ्याची गुण अदलाबदली झाले. 2021 साली परीक्षेत 0 गुण मिळाले. त्यामुळे ती बारावीची परीक्षा देऊ शकली नाही. मात्र शुन्य गुण मिळाल्याने आणि हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतरही कानाडोळा केल्यानंतर त्या विद्यार्थीनीने न्यायालयात धाव घेतली होती. तिने परीक्षेच्या निकालात सुधारणा करण्याची आणि सुधारित प्रमाणपत्रे देण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती विकास बहल म्हणाले, ‘ही गोष्ट लक्षात घ्य़ायला हवी की, शाळेने केलेल्या चुकीमुळे केवळ याचिकाकर्त्यालाच नाही तर बोर्डालाही चूक नसताना फटका बसला आहे. याचिकाकर्त्याने गुणांच्या दुरुस्तीमध्ये सीबीएसईच्या हस्तक्षेपाची मागणी केली असता, त्याला सांगण्यात आले की , शाळेने वेळेत ऑनलाइन पोर्टलवर सुधारित गुण सादर केले नाहीत.
याचिकाकर्त्याने वारंवार याबाबत विचारणा केली असता शाळेकडून बोर्डाकडे अर्ज पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने नोटीस पाठवूनही त्याकडे शाळेने कानाडोळा केला, शिवाय त्या याचिकेत केलेल्या आरोंपांबाबतही काही उत्तरे मिळाली नाहीत. न्यायालयाने म्हटले आहे की, याचिकाकर्त्याने अकरावीची परीक्षा पास होऊनही शाळेच्या हलगर्जीपणामुळे ती 12वीच्या परीक्षेला बसू शकली नाही. निष्काळजीपणाबद्दल न्यायालयाने शाळेला 30 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच हा दंड सीबीएसईला भरण्याच्या सूचना दिल्या.






















































