
सामना विशेष प्रतिनिधी । मुंबई
पोलीस कोठडीतील मृत्यू रोखण्याबरोबरच पोलीस ठाण्याच्या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईतल्या महत्त्वाच्या २५ पोलीस ठाण्यांमध्ये ४१० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम पूर्ण झाल्याचे गृहखात्याने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या कॅमेऱ्यांमधील रेकॉर्डिंग एक वर्षासाठी जतन करून ठेवण्यात येईल. आता यापुढे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनासह पोलीस कोठडीवर यापुढे तिसऱ्या डोळय़ाची अहोरात्र नजर राहणार आहे. उर्वरित पोलीस ठाण्यांत दुसऱ्या टप्प्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील.
पोलीस कोठडीतील एका मृत्यूसंदर्भात लिओनार्ड झेवियर वल्दारीस व अन्य काहीजणांनी राज्य सरकारच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिक दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने पोलीस कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामधील व्हरांडे (कॉरीडॉर), रूम व पोलीस कोठडीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात मुंबईतल्या २५ पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. महिला कक्ष व विश्रांती कक्ष वगळून चार्ज रूम, पोलीस ठाण्यातील चार्ज रूम, पोलीस कोठडीत, मार्गिका व स्टेशन हाऊस या ठिकाणी मिळून ४१० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
या पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही कॅमेरे
कुलाबा, एमआरए, व्ही. पी. मार्ग, दादासाहेब भडकमकर मार्ग, वडाळा, नागपाडा, वरळी, काळाचौकी, रफी अहमद किडवाई, माहीम, कुर्ला, चेंबूर, नेहरूनगर, घाटकोपर, विक्रोळी, वाकोला, वांद्रे-कुर्ला, सांताक्रुझ, जुहू, पवई, एमआयडीसी, मालाड, मालवणी, दिंडोशी, दहिसर.
या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
– चार्ज रूम
– पोलीस कोठडी
– मार्गिका
– स्टेशन हाऊस
– वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे दालन
– पोलीस ठाण्याचा संपूर्ण परिसर
दोन कोटींचा खर्च
राज्य सरकारने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पहिल्या टप्प्यात ४१० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. यातील रेकॉर्डिंग एक वर्षाच्या कालावधीसाठी जतन करता येईल. त्यामुळे कोणत्याही घटनेचा पुरावा न्यायालयात सादर करता येईल. पहिल्या टप्प्यात २५ पोलीस ठाण्यांत प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण झाल्याचे गृह विभागाने जारी केलेल्या शासन आदेशात नमूद केले आहे.



























































