
कायम वाचावीत अशी वाटणारी पुस्तकं म्हणजे भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, चिं. वि. जोशी, साने गुरूजी यांची सर्व पुस्तकं. याबरोबरच जी. ए. कुलकर्णींच्या सर्व कथा मला पुन: पुन्हा वाचायला आवडतात. रंगनाथ पठारे, राजन गवस यांच्या नंतरची नावं म्हणजे आसाराम लोमटे, बालाजी सुतार, किरण येले, सरदार जाधव या सध्याच्या घडीच्या लोकप्रिय लेखकांची पुस्तकं वाचायला कायमच आवडतं. हे सगळे सशक्त लेखक आहेत. सरदार जाधव यांचं माणसं आणि कणसं, आसाराम लोमटे यांचं लोलक, बालाजी सुतार यांचं दोन्ही शतकांच्या सांध्यावरच्या गोष्टी ही पुस्तकं आवर्जून वाचायला हवीत अशी आहेत. हे सगळे लेखक आजच्या पिढीच्या, ग्रामीण भागाच्या अस्वस्थतेच्या नोंदी मांडतात. म्हणूनच त्यांचं लिखाण समकालीन आणि तितकंच वास्तववादी ठरतं. गावकुसाचं खरं दर्शन घडवणारं असं या सगळ्या लेखकांचं लेखन आहे, जे आजच्या पिढीने आवर्जून वाचायला हवं. मराठीतील महत्त्वाच्या पुस्तकांची मुखपृष्ठं साकारणारे सरदार जाधव हे उत्कृष्ट कथाकार आहेत. कष्टकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांच्या व्यथा, समस्यांचं सखोल निरीक्षण अगदी प्रामाणिकपणे त्यांनी मांडलं आहे.
असेच आवडते लेखक म्हणजे जयंत पवार. जयंत पवारांनी कथेत केलेले प्रयोग वाचकाला अचंबित करून टाकतात. लेखनात एवढय़ा सशक्त पद्धतीचे प्रयोग आपल्याकडे फारसे आढळत नाहीत. शहरी सामान्य माणसाचं जगणं मांडणारं त्यांचं लेखन अस्वस्थ करतं, जागं करतं असंच म्हणायला हवं. या सगळ्या लेखकांमधील समान दुवा म्हणजे सामान्य माणसाचं जगणं कोणताही मुलामा, रंगरूप न देता त्यांनी मांडलं आहे.
अशा वास्तववादी, वैचारिक लेखनासोबतच कविता हादेखील माझा आवडता प्रांत आहे. दासू वैद्य, अनिल साबळे, सौमित्र यांच्या कविता वाचायला आवडतात. दासूंच्या तत्पूर्वी या काव्यसंग्रहातील सर्वच कविता अप्रतिम आहेत. किशोर कदमची रंगभूमीवरील कविता माझी सगळ्यात आवडती कविता आहे.
माझ्या वाचनाची सुरूवात वर्तमानपत्रांतूनच झाली. एकाच वेळी अनेक वर्तमानपत्रं मी वाचत असे. या माध्यमातून वेगवेगळे लेखकांचं वाचन झालं. मात्र अगदी पहिल्यापासून आणि आजही भालचंद्र नेमाडे हेच माझे आवडते लेखक आहेत. लिखाणाला जी वैचारिक बैठक लागते तशी असणारे फार कमी लेखक आहेत आणि नेमाडे त्यांपैकी एक आहेत. एका कादंबरीत एवढा मोठा पट, असंख्य लोकांचं आयुष्य ते उभं करतात. याबरोबरच नेमाडे हे कवी म्हणूनही फार आवडतात. त्यांचा ‘देखणी’ हा कवितासंग्रह अप्रतिम आहे. या संग्रहातील ‘कशा रांगोळ्या काढता घरंदाज व्यथांनो’ ही कविता, ही ओळ कायम स्मरणात राहणारी आहे. स्त्रीचं इतकं सुंदर वर्णन आतापर्यंत कोणीच केलं नसावं.
नेमाडे काळाच्या पुढे विचार करणारे लेखक आहेत असं मला कायमच वाटतं. नेमाडे आपल्यातील वाचक घडवतात आणि त्याबरोबरच आपल्यातला माणूस घडण्याची क्रिया सुरू होते. संवेदना रुजण्याचा हा प्रवास पुस्तकांमुळे घडतोय हे खूपच आनंददायी आहे.
शब्दांकन – शुभांगी बागडे





























































