
कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. कोरोना रुग्ण संख्येत नेहमी सणासुदीनंतर वाढ होते हे यापूर्वीही दिसून आले आहे. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये येणारे सण, उत्सव जबाबदारीने साजरे करा, गर्दी टाळा, नियम पाळा, असा स्पष्ट इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. त्यामुळे गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यंदाही कोरोना नियमांसोबतच साजरी करावी लागणार आहे.
देशात बहुतेक ठिकाणी अनलॉक झाले असून बाजारपेठांसह अनेक व्यवहार खुले झाले आहेत. त्यामुळे गर्दी होत असून लोकांकडून नियम पाळले जात नाहीत असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत सावधगिरीचा इशारा दिला आहे. देशात तिसरी लाट येणार का, याविषयी वेगवेगळे तर्क मांडले जात असले तरी अजूनही दुसरी लाट ओसरलेली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
24 तासांत रुग्ण संख्या 46 हजारांवर
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या 40 हजारांपेक्षा कमी होती. मात्र गेल्या 24 तासांत रुग्ण संख्येत तब्बल 23 टक्क्यांनी वाढ झाली. 46 हजार 164 रुग्णांची नोंद झाली असून 607 जणांचा मृत्यू झाला आहे. 34 हजार 151 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रिकव्हरी रेट 97.63 टक्के असून पॉझिटिव्हिटी रेट 2.98 टक्क्यांवर आहे.
आरोग्य मंत्रालयाने काय म्हटले?
n सणासुदीच्या काळात गर्दी होते आणि त्यानंतर कोरोनाचा संसर्ग होऊन रुग्ण संख्येत वाढ होते. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात येणारे सण (गणेशोत्सव, दसरा, दिवाळी) जबाबदारीने साजरे करा.
n लसीकरणामुळे कोरोना रोगाची तीक्रता कमी होते आणि रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासारखी गंभीर स्थिती ओढवत नाही. परंतु लस घेतली तरी लोकांनी संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर केला पाहिजे. कोरोना नियमांचे पालन आवश्यक आहे. गर्दी करणे टाळले पाहिजे.
n सणासुदीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी दोन लसची अट असावी.




























































