मध्य रेल्वेवर गणेशभक्तांसाठी रात्रीच्या 22 विशेष लोकल ट्रेन, बुधवारपासून शनिवारपर्यंत मेन लाईनसह हार्बरवर सेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्ताच्या सोईसाठी मध्य रेल्वेने विशेष गाडय़ांची व्यवस्था केली आहे. बुधवारी, 23 सप्टेंबरपासून शनिवारपर्यंत मेन लाईनसह हार्बर मार्गावर रात्री उशिरा एकूण 22 विशेष लोकल ट्रेन चालवण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ठाणे आणि परतीच्या प्रवासासाठी 18 विशेष रात्रीच्या लोकल चालवण्यात येणार आहेत. या गाडय़ा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याणदरम्यान 23 सप्टेंबर, 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबरच्या रात्री चालवण्यात येणार आहेत. हार्बर लाईनवर केवळ गणपती विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच 25 सप्टेंबरच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि परतीच्या प्रवासासाठी 4 विशेष लोकल ट्रेन धावणार आहेत. या विशेष गाडय़ांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ठाणे/पनवेलदरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबा दिला जाणार आहे.

मेन लाईन  (बुधवारी रात्री ते शनिवारी रात्रीपर्यंत)

सीएसएमटी-कल्याण विशेष 1ः सीएसएमटी येथून रात्री 1.40 वाजता सुटेल व कल्याण येथे 3.10 वाजता पोहोचेल. सीएसएमटी-ठाणे विशेष 1ः सीएसएमटी येथून 2.30 वाजता सुटेल आणि ठाणे येथे 3.30 वाजता पोहोचेल. सीएसएमटी-कल्याण विशेष 3ः सीएसएमटी येथून 3.25 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 4.55 वाजता पोहोचेल. n कल्याण-सीएसएमटी विशेष 2ः कल्याण येथून 12.05 वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे 1.30 वाजता पोहोचेल. सीएसएमटी विशेष 2 ही गाडी ठाणे येथून 1.00 वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे 2.00 वाजता पोहोचेल. ठाणे-सीएसएमटी विशेष 4 ही गाडी ठाणे येथून 2.00 वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे 3.00 वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावर (शुक्रवारी रात्री)

सीएसएमटी येथून विशेष गाडी 1.30 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 2.50 वाजता पोहोचेल. आणखी एक विशेष गाडी सीएसएमटी येथून 2.45 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 4.05 वाजता पोहोचेल.

पनवेल येथून विशेष गाडी 1.00 वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे 2.20 वाजता पोहोचेल. तसेच दुसरी गाडी पनवेल येथून 1.45 वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे 3.05 वाजता पोहोचेल.