कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांना पिटाळले; दादा, हिमालयात जा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदारांना ‘ईडी’ची धमकी दिल्यानंतर आज मतदान सुरू असताना केंद्रावर भेटी देत फिरणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आज मंगळवार पेठ परिसरात एका मतदान केंद्रावर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले.

कोल्हापूर जिह्याबाहेरील वाहने आणि कार्यकर्त्यांसह पक्षाच्या टोप्या व स्कार्फ घालून दबावतंत्र व शक्तिप्रदर्शन करीत चंद्रकांत पाटील मतदान केंद्रावर आल्याने संतप्त मतदार, तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना माघारी जाण्यास भाग पाडले. यावेळी ‘जय श्रीराम’सह ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यातच ‘दादा, हिमालयात जा…’ अशाही घोषणा देण्यात आल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. चंद्रकांत पाटील यांना मतदान केंद्र परिसरातून हाकलून लावण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियातून चांगलाच व्हायरल झाला.

61 टक्के मतदान

काही किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता, शांततेत मतदान पार पडले. दिवसभरात सरासरी 61 टक्के मतदान झाले. यामध्ये 1लाख 46 हजार 18 महिलांनी आणि 1लाख 45 हजार 768 पुरुषांनी मतदानाचा हक्क बजाविला. कोल्हापूर शहरातून पहिल्या महिला आमदार म्हणून विजयी होण्याचा मान महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना मिळणार की भाजपचा पहिला आमदार होण्यात सत्यजीत कदम बाजी मारतील, याचा फैसला शनिवारी (दि. 16) मतमोजणीत होणार आहे.

 कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शहरात आज मोठय़ा चुरशीने मतदान झाले. चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघात जिह्याबाहेरील वाहने, तसेच बाहेरच्या कार्यकर्त्यांसह प्रत्येक मतदान केंद्रावर भेट दिली.