देवई गावात सापडली प्राचीन काळातील हजारो शिल्पे आणि देवतांच्या मूर्ती

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णामधलं देवई गाव हे दुर्लक्षित गाव आहे. या गावात इतिहास संशोधकांनी सखोल अभ्यास केला तर आजवर उजेडात नसलेला इतिहासही सर्वसामान्यांना कळू शकेल. या गावामध्ये हजारो दगडी शिल्प आणि देवी-देवतांच्या शिल्पाकृती सापडल्या आहेत. पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे या शिल्पांवर किंवा शिल्पाकृतींवर आजवर लक्ष गेलेले नाही. यातली काही शिल्पे ही काळाच्या ओघात नष्ट होऊ लागली आहेत. ती वाचवण्यासाठी आणि सुस्थितीत असलेली शिल्पे जपण्यासाठी या गावातील सगळे आदिवासी एकवटले आहेत. त्यांनी या शिल्पांची आणि शिल्पाकृतींच्या त्यांना जमेल तशी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याल्यात पोंभूर्णा ऐश्वर्यसंपन्न इतिहास लाभला आहे. यातल्या देवई गावात बहुसंख्य आदिवासी राहतात. गावची लोकसंख्या ही जेमतेम एक हजाराच्या आसपास आहे. शेती आणि मोलमजुरी हेच इथलं आर्थिक उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. या गावाला अगदी लागूनच तलाव आहे. तलावाच्या किनाऱ्यावर एक लहानसं मंदीर आहे. या मंदिरात देखणी शिल्पे पाहायला मिळतात.

अशीच शिल्पे ही आसपासच्या शेतात, परसबागेत, गावात, अंगणात आणि गावाला लागून असलेल्या किर्र जंगलातही सापडतात. ही ओबडधोबड शिल्पे नसून ती अत्यंत देखणी शिल्पे आहेत. गावाला लागून असलेल्या तलावातही अशाच प्रकारची अनेक शिल्पे असल्याचे गावकरी सांगतात. तलावात भरपूर पाणी असल्याने ती दिसत नाहीत. जर ती बाहेर काढली आणि या परिसरातील शिल्पांचा एकत्रितरित्या अभ्यास केला तर इतिहासातील नव्या बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.