
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं सर्व शाळांना सुटी जाहीर केली असली, तरी चंद्रपुरात जिल्हा परिषद शाळा सुरूच आहेत. शाळा बंद ठेवण्यासंदर्भात कोणतेही निर्देश मिळाले नसल्यानं या शाळा सुरू ठेवण्यात आल्या. जिल्ह्यात नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंद कराव्या, असं शासकीय निर्देशत स्पष्टपणे नमूद आहे. मात्र जिल्हा परिषद संचालित शाळांना असे कोणतेच निर्देश प्राप्त न झाल्यानं आज दिवसभर या शाळा सुरू होत्या.
पहिली ते नववीपर्यंतचे सर्व वर्ग आज सुरू होते. विद्यार्थ्यांना शाळा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानं उपस्थिती जशीच्यातशी दिसली. गर्दी टाळणं, हा एक उपाय सुचवला असताना तो जिल्हा परिषद शाळांत लागू का केला गेला नाही, हा प्रश्नच आहे. शासनाकडून कोणतेच पत्रक किंवा वरिष्ठांचे मौखिक निर्देश प्राप्त न झाल्यानं शाळा सुरू असल्याचं शिक्षकांनी सांगितलं.


























































