
सामना ऑनलाईन । बंगळुरू
हिंदुस्थानची महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-2’ मोहीम काही दिवसांपूर्वी थांबवण्यात आली असली तरी इस्रोने यातील सर्व प्रकारचे तांत्रिक बिघाड दुरुस्त केले असून हे यान उड्डाणासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. इस्रोने या मोहिमेसाठी गुरुवारी नवी तारीख जाहीर केली असून ‘चांद्रयान-2’ आता येत्या 22 जुलैला अंतराळात झेपावणार आहे. येत्या सोमवारी दुपारी 2 वाजून 53 मिनिटांनी हे यान चंद्रावर झेप घेणार आहे असे इस्रोकडून सांगण्यात आले.
सोमवारी, 15 जुलैला मध्यरात्री 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान-2 अंतराळात झेप घेणार होते. मात्र क्रायोजेनिक इंजिनमधील हेलियम गॅस बॉटलच्या जॉइंटमधून गळती झाल्यामुळे 56 मिनिटे आणि 24 सेकंद उरले असतानाच उड्डाण रद्द करण्यात आले. आता एकाच आठवड्याने हे यान उड्डाण करणार आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर स्वारी करणारे हिंदुस्थान हे चौथे राष्ट्र ठरणार आहे.


























































