
केंद्रीय तपास यंत्रणांचा विरोधकांना संपवण्यासाठी वापर होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एकदिवसीय शिबीर शुक्रवारी मुंबईतील घाटकोपर येथे पार पडले. या शिबिरात उपस्थित कार्यकर्त्यांना भुजबळ यांनी ‘मुंबई महानगरपालिकेमधील सत्तेचे राजकारण, अर्थकारण, उदात्तीकरण-शासनाचा हस्तक्षेप’ या विषयावर मार्गदर्शन करताना केले. यावेळी त्यांनी तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
मुंबईचं महत्व कमी करण्यासाठी मुंबईतील महत्वाची शासकीय कार्यालये, संस्था आणि उद्योगही बाहेर नेले जात आहेत. लाखो तरुणांचा रोजगार गेला पण राज्य सरकार काहीही बोलायला तयार नाही. बोललं की ईडीची बिडी पेटल्याशिवाय राहत नाही, अशी खोचक टीका छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर केली. यावेळी त्यांनी खारघर येथे घडलेल्या घटनेवरूनहीसरकारवर कडक ताशेरे ओढले.
उन्हातान्हात निष्पाप लोकांचा बळी गेला. भारतरत्नसारखा पुरस्कारही दिल्लीच्या भवनात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दिला जातो. मग महाराष्ट्र भूषणच्या या कार्यक्रमातून कोणाची ताकद दाखवायची होती. या सरकारला आपल्या पाठीमागे किती लोक आहेत, हे दिल्लीवाल्यांना दाखवायचं होतं का? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.
महापालिकेच्या निवडणुका घेण्याबाबत निर्णय होत नाही. प्रशासक नेमले आहेत. प्रशासक नेमल्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळतो. नगरसेवक प्रश्न विचारतात. पण आता स्थायी समिती, जनरल बॉडी तीच मग प्रश्न कोणाला विचारणार असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. निवडणुका लांबत चालल्या आहेत. साध्या साध्या गोष्टींमध्ये भ्रष्टाचार आहे, असेही ते म्हणाले.
गावात दोन मुलांच्या भांडणातही ‘ईडी’ची धमकी दिली जाते! शरद पवार यांनी पुन्हा डागली तोफ
राजस्थान सरकार एका गॅस सिलिंडरमागे 600 रुपये अनुदान देतंय, वैद्यकीय उपचारासाठी 25 लाख रुपयांपर्यंत खर्च देत आहे. आपलं सरकार एसटीचा अर्ध तिकीट देतंय. त्याचबरोबर महाराष्ट्रात अनेक विकासकामे रखडलेली आहेत. या विरोधात लढण्याची गरज आहे. रस्त्यावर उतरण्याची, आंदोलन करण्याची गरज आहे. कारण लढणाऱ्याच्या पाठीमागे दुनिया येते, रडणाऱ्याच्या पाठीमागे कोणी येत नाही, असेही ते म्हणाले.


























































