
आज सगळीकडे होलिकोत्सवाची धूम उडाली आहे. होळी पौर्णिमेला होलिका दहन करून सर्व अमंगल नष्ट होऊ दे, अशी प्रार्थना करून आज तमाम बांधव धुलिवंदनाच्या रंगात रंगले आहेत. पण, दुसरीकडे अशीही काही गावं देशात आहेत, जिथे हा सण अशुभ मानला जातो.
छत्तीसगड राज्यातील काही गावं अशी आहेत, जिथे गेल्या 100 वर्षांहून अधिक काळ कुणीही कधीच होळी खेळलेलं नाही. ही गावं छत्तीसगडच्या रायगढ जिल्ह्यात येतात. अमलीपाली, छिंदपतेरा, मंजूरपाली, जगदीशपूर अशा काही गावांमध्ये गेल्या अनेक पिढ्या होळीचा सणच साजरा झालेला नाही. कारण, इथे अशी समजूत आहे की जो होळी साजरी करतो त्याचा मृत्यू ओढवतो. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत इथे होलिका दहन आणि धुलिवंदन झालेलंच नाही.
ही प्रथा नेमकी कशी सुरू झाली, ते निश्चितपणे कुणालाच सांगता येत नाही. पण, काही जणांच्या माहितीनुसार, अनेक वर्षांपूर्वी या गावात एक मोठा सावकार राहत होता. त्याने एकदा होळी साजरी केली होती. त्यानंतर गावात शिरलेल्या वाघाने त्याची शिकार केली. त्यानंतर एका व्यक्तिला एक स्वप्न पडलं. त्या व्यक्तिने त्या स्वप्नाची माहिती ग्रामस्थांना सांगितली. त्या स्वप्नानुसार, ग्रामस्थांना मंजुरपलिहिन नावाच्या देवीचं मंदिर बांधावं लागेल आणि कुणीच कधीही होळी साजरी करणार नाही, अशी अट घालण्यात आली होती. तेव्हापासून ग्रामस्थांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला की भविष्यात कधीच कुणीच या गावात होळी खेळू नये.





















































