भीषण अपघातात बालकलाकाराचा मृत्यू

71

सामना ऑनलाईन । रायपूर 

‘ससुराल सिमर का’, ‘संकटमोचन हनुमान’ यासारख्या मालिकांमधील भूमिकांमुळे लोकप्रिय झालेला बालकलाकार शिवलेख सिंह याचा अपघातात मृत्यू झाला आहे. या 14 वर्षांच्या बालकलाकराचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

शिवलेख व त्याचे कुटुंबीय गुरुवारी रायपूरला जात असताना त्यांची कारची समोरुन येणाऱ्या ट्रकशी टक्कर झाली. या अपघातात शिवलेखचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची आई लेखना सिंह व वडिल शिवेंद्र सिंह गंभीर जखमी आहेत. शिवलेख याने ‘ससुराल सिमर का’, ‘संकटमोचन हनुमान’, ‘केसरी नंदन’, ‘अग्नीफेरा’, ‘बालवीर’ यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकांमधील भूमिकांमुळे तो लोकप्रिय झाला होता. त्याच्या व्यक्तीमत्त्वामुळे चित्रीकरणादरम्यानही त्याने सगळ्यांची मने जिंकली होती आणि तो सगळ्यांचा लाडका झाला होता. त्याच्या या मत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

शिवलेखच्या मृत्यूची बातमी आमच्यासाठी धक्कादायक असल्याचे ‘केसरी नंदन’ या मालिकेतील शिवलेखचा सहकलाकार दक्ष अजित सिंह याने सांगितले. शिवलेख हजरजबाबी आणि हुशार मुलगा होता. मी त्याच्यापेक्षा वयाने मोठा आहे. त्यामुळे तो माझ्याशी मनमोकळेपणे बोलायचा. आमचे स्वभाव जुळल्याने आमच्यात मैत्रीचे अतूट नाते तयार झाले होते. अनेकदा मला चक्रावून टाकणारे प्रश्नही तो विचारायचा. माझ्या अनुभवानुसार मी त्याला उत्तरे द्यायचो, असे दक्षने सांगितले. आमच्यातील मैत्रीचे नाते दृढ झाल्यावर कौटुंबीक गोष्टीही तो मला सांगायचा. आपले नाते खास असल्याने मी तुम्हाला मुंबईत येऊन नक्की भेटेन, असे शिवलेख मला 30 जूनला चित्राकरणाच्या शेवटच्या दिवशी मला म्हणाला होता. मात्र, आता ते शक्य नसल्याचे सांगताना दक्षला अश्रू अनावर झाले होते. आता शिवलेख माझ्या नेहमी स्मरणात राहील असेही त्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या