
जगभरात चीनने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत हजारो लोकांचा जीव गेला आहे. चीनने याबाबत जगाशी माहिती लपवल्याने हे संकट ओढवले आहे. 17 नोव्हेंबर रोजी कोरोना लागण झालेला पहिला रुग्ण आढळला होता. ही माहिती चीनने लपवली होती.
चीनमधील साउथ चायना मॉर्निंग पोस्टने याबाबत वृत्त दिले आहे. या वेबसाईटच्या हाती काही सरकारी कागपत्र सापडली आहेत. त्यानुसार 17 नोव्हेंबर रोजी कोरोनाचा रुग्ण आढळला होता. परंतु त्याची माहिती 21 दिवसांनंतर म्हणजेच 8 डिसेंबर 2019 रोजी देण्यात आली होती. डिसेंबर 2019 पर्यंत 266 रुग्ण आढळले होते तर 1 जानेवारी 2020 पर्यंत रुग्णांची संख्या 381 झाली होती. 27 डिसेंबर रोजी हुबेई प्रांतातील एका डॉक्टरांनी सांगितले की अशा प्रकारच्या व्हायरसबद्दल डॉक्टरांना कल्पना नव्हती. त्यानंतर या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत गेला.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोरोनाचा पहिला रुग्ण 8 डिसेंबर रोजी आढळला होता. तर लॅन्सेट मेडिकल जर्नलच्या अहवालानुसार चीनमध्ये पहिल्यांदा 1 डिसेंबर रोजी कोरोनाचा रुग्ण आढळला होता. तसेच त्या रुग्णाला वुहानच्या झिंयिंतान इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
चीनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 3 हजार 200 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजूनही 80 हजार 860 जणांना याची लागण झाली आहे. जगात आतापर्यंत 6 हजार 517 जणांचा मृत्यू झाला असून 1 लाख 69 हजार 484 जणांना याची लागण झाली आहे.


























































