
सामना ऑनलाईन। बीजिंग
पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणारा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बचाव करणाऱ्या चीन विरोधात हिंदुस्थानात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. पण हिंदुस्थानची इच्छा असो वा नसो, वाटल्यास बहिष्कार टाका पण तुम्हाला आमचीच उत्पादनं घ्यावी लागतील कारण तुमच्याकडे पर्याय नाही, अशी उपहासात्मक टीका करत चीनने हिंदुस्थानला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
चीनच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रात यासंदर्भातील एक लेख प्रसिद्ध झाला आहे. मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचे हिंदुस्थानचे सर्व प्रयत्न चीनने हाणून पाडले. यामुळे हिंदुस्थान चीनवर नाराज आहे. यापार्श्वभूमीवर हिंदुस्थानमध्ये सोशल मीडियावर #बॉयकॉट चीनी उत्पादन ही मोहीम लोकप्रिय झाली आहे. पण हिंदुस्थानने कितीही प्रयत्न केलेतर त्यात त्याला यश मिळणार नाही. कारण चीन ज्या उत्पादनांची निर्मिती करतो ते हिंदुस्थान करू शकत नाही. हिंदुस्थानचे निर्मिती क्षेत्र आजही अविकसित असून आमच्या समोर ते टिकू शकत नाही. यामुळे त्यांच्याकडे चीनी उत्पादनाला पर्याय नाही, अशा गमजा लेखातून मारण्यात आल्या आहेत. तसेच आगामी निवडणुकांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी जर चीनचा वापर केला तर ते हिंदुस्थानला महागात पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हिंदुस्थानी नेत्यांनी ट्विटरवर घोषणाबाजी करण्यापेक्षा देश बळकट करण्यावर लक्ष द्यावे, असेही या लेखात म्हटले आहे.

























































