
चिनी दूतावासातील काही अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयाला भेट दिल्याचे वृत्त आहे. चीनवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालकांनी सातत्याने टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर चिनी अधिकाऱ्यांनी संघ मुख्यालयाला भेट दिल्याने सगळ्यांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत. हिंदुत्ववादी संघटनेच्या मुख्यालयाला अथवा कार्यालयाला चिनी अधिकाऱ्यांनी भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीमध्ये संघाच्या एका पदाधिकाऱ्याने चिनी दूतावासाचे अधिकारी संघ मुख्यालयात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिल्याचे म्हटले आहे.
युरोपीय देशांच्या दूतावासाचे अधिकारी रा.स्व.संघाच्या पदाधिकाऱ्यांना भेटत असतात. मात्र कम्युनिस्टांची सत्ता असलेल्या चीनच्या दूतावासातील अधिकाऱ्यांनी संघ मुख्यालयाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे अधिकारी संघ मुख्यालयामध्ये आले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी त्यांची भेट होऊ शकली नाही. भागवत हे दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची अधिकाऱ्यांना भेट घेता आली नाही. मात्र संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने या अधिकाऱ्यांचे स्वागत केले आणि त्यांना मुख्यालय दाखवले. ज्या अधिकाऱ्यांनी ही भेट दिली ते दूतावासातील मधल्या फळीतील अधिकारी असून ते दिल्ली आणि मुंबईत तैनात आहेत.
या चिनी अधिकाऱ्यांनी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठालाही भेट दिली. या संस्थेतून चिनी भाषेसंदर्भातील काही अभ्यासक्रमही चालवले जातात. मात्र, या अधिकाऱ्यांचा मुख्य उद्देश हा संघ मुख्यालयाला भेट देण्याचा होता. 2020 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी गलवानमधील संघर्षाचा उल्लेख केला होता. चीनशी सामना करण्यासाठी भारताला सीमेवर आपली ताकद वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते.

























































