
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सीने आणखी तीन महिने हिंदुस्थानात येण्यास नकार दिला आहे. चोक्सीला आर्थिक फरारी आरोपी घोषीत करण्याच्या मागणीसाठी शनिवारी मुंबई न्यायालयात सुनवणी झाली. या सुनावणीत चोक्सीच्या वकिलांनी चोक्सी पूर्णपणे स्वस्थ नसून तो प्रवास करु शकत नाही. त्यामुळे न्यायालय व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे त्याचा जबाब नोंदवू शकतात. तसेच त्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी एण्टीगुआला येऊ शकतात किंवा चोक्सीला डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर तीन महिन्यांनी तो परतेल, तोपर्यंत तो वाट पाहू शकतात, असेही त्याच्या वकिलांनी स्पष्ट केले. त्याची तब्येत सुधारल्यावर त्याला प्रवासाची परवानगी मिळाल्यावर तो स्वतः न्यायालयात येऊन जबाब नोंदवणार असल्याचेही त्याच्या वकिलांनी सांगितले.
पीएनबी घोटाळ्यातील आरोपी चोक्सीविरोधात सीबीआय आणि ईडी तपास करत आहेत. चोक्सीला आर्थिक फरारी आरोपी घोषित करण्यासाठी ईडीने मुंबईतील विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सीबीआयने चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थाचे कारण देत तो हिंदुस्थानात येण्यासाठी टाळाटाळ करत आहे. आता त्याने तीन महिने आपण प्रवास करू शकत नसल्याने हिंदुस्थानात परतू शकत नसल्याचे सांगितले. सुमारे 13 हजार कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यात नीरव मोदीसह चोक्सीही प्रमुख आरोपी आहे. 2011 ते 2018 या काळात बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग्जद्वारे (एलओयू) त्यांनी कोट्यवधी रुपये त्यांच्या परदेशी खात्यांमध्ये वळवले आहेत.
हा घोटाळा उघड होण्याआधीच मोदी आणि चोक्सी देश सोडून पळून गेले आहे. चोक्सीने एण्टीगुआचे नागरिकत्व स्विकारले असून तो सध्या तेथेच आहे. त्याला परत आणण्यासाठी सीबीआयचे प्रयत्न सुरू आहे. त्याने हिंदुस्थानात परतण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, प्रकृती अस्वास्थाचे कारण देत तो येण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे सीबीआयने त्याच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू केले आहेत.

























































