यवतमाळमध्ये शहर काँग्रेस कमिटीचे अर्धनग्न आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीसह वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांची बदली व वाढवी मालमत्ता कर आकारणी रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी शहर काँग्रेस कमिटीचे नगरपरिषदेसमोर 4 जानेवारीपासून आंदोलन सुरू आहे. शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी अर्धनग्न आंदोलन करीत रोष व्यक्त केला आहे.

गेल्या 6 महिन्यांपासून यवतमाळ शहरामध्ये वादग्रस्त ठरत असलेले नगर परिषदेचे मुख्याधिकारी विधानपरिषद व विधानसभेत वादग्रस्त ठरले आहेत. त्यानंतरही शासन व प्रशासनाने मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्यावर निलंबनाची कारवाई न करता त्यांना अभय देण्याचा प्रकार स्थानिक आमदार मदन येरावार यांनी केल्याबाबत शहर काँग्रेस कमिटीतर्फे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला. जोपर्यंत आमची ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. भविष्यात नगर परिषदेचे मुख्याधिकारी व स्थानिक आमदारांना जनतेसमोर पूर्णनग्न आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रविण देशमुख, युवा नेते ओम तिवारी, कैलाश सुलभेवार, विशाल पावडे, प्रियंका बिडकर, मनिषा देशमुख, विद्या राठोड, अजय किनीकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.