
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी होणाऱया निवडणुकीत जागा वाटपावरून महायुतीमध्ये निर्माण झालेला कलह अजूनही मिटलेला नाही. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे गटातील तिढा कायम आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज याची कबुली दिली. या तीन जागांचा फैसला करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चांना वेग आला आहे.
विधान परिषदेच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जागांवर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद आहेत. शिंदे गटाने या दोन्ही जागांसाठी आग्रह धरला आहे तर भाजपचे या जिल्ह्यांमधील आमदार या जागा आपल्यालाच मिळायला हव्यात अशा भूमिकेचे आहेत. दुसरीकडे पुण्याची जागा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहे. त्या जागेवरही भाजपने दावा केला आहे.
‘जवाहर बाल भवन’च्या नूतन वास्तूच्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी मुख्यमंत्री फडणवीस यांना विधान परिषदेच्या जागा वाटपाला होत असलेल्या विलंबाबद्दल विचारले. त्यावर पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरच्या जागेबाबत तीनही पक्षांची चर्चा सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेबाबत भाजप आणि शिंदे गटाची चर्चा सुरू आहे तर पुण्याच्या जागेबाबत आमची राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर वाटाघाटी सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या जागांवर अद्याप अंतिम तोडगा निघालेला नसला तरी आम्ही तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसून यातून सन्मानजनक मार्ग काढू, असे फडणवीस यांनी सांगितले.






























































