
जलक्रांतीतून हरित क्रांती येणार आहे आणि हरित क्रांतीतून सुबत्ता. पण हे कुणा एकाचे काम नाही, तर ते सर्वांनी एकत्र येऊन करावयाचे काम आहे. पाण्याची शास्त्रशुद्ध साठवणूक, पाणी वापर, पाणी नियोजन, पीक पद्धती, पौष्टिक गवताची निर्मिती अशा सर्व महत्त्वाच्या विषयांचा संस्कार आणि शिक्षण देण्याचे काम पाणी फाऊंडेशनने केले. पाणी नियोजनाचा हा संस्कार गावाला आणि महाराष्ट्राला समृद्ध करील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
22 मार्चच्या जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ स्पर्धेचा (पहिला टप्पा) गौरव सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, जलक्रांतीतून हरित क्रांती येणार आहे आणि हरित क्रांतीतून सुबत्ता. पण हे कुणा एकाचे काम नाही, तर ते सर्वांनी एकत्र येऊन करावयाचे काम आहे. टीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती करणे शक्य असल्याचे सांगतानाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण आणि आर्थिक समृद्धीच्या वाटेवर मार्गस्थ झालेल्या गावांचे, गावकऱयांचे कौतुक केले तसेच शासन या सर्व कामात त्यांच्यासोबत असल्याची ग्वाहीही दिली.
या कार्यक्रमात राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे याशिवाय पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आणि प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, समृद्ध गाव योजनेतील गौरवाला पात्र ठरलेल्या गावातील नागरिक, राज्याच्या 18 जिह्यांचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीही या कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी झाले होते.
दक्षता समित्यांनी गावांची काळजी घ्यावी
कोरोनाने पुन्हा खूप मोठय़ा प्रमाणात डोके वर काढले असल्याने गावागावात स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समित्यांनी शारीरिक अंतर पाळणे, मास्क लावणे, स्वच्छता राखणे यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर काम करावे. गावात कुणी विनामास्क फिरत असेल तर त्याला मास्क लावण्याची, त्रिसूत्रीचे पालन करायला लावण्याची शिस्त लावावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
कृषी विभागाच्या योजनांचेही बळ देणार – कृषिमंत्री
कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी शास्त्रशुद्ध नियोजनामुळे समृद्ध गाव स्पर्धा यशस्वी होईल असे म्हटले तसेच देशातील शेतकऱयांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, शेतकरी चिंतामुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ‘विकेल ते पिकेल’ योजनेची अंमलबजावणी केली जात असल्याची माहिती दिली. समृद्ध गाव योजनेत सहभागी गावांमध्ये कृषी विभागाच्या योजनांचे बळ देऊन आपण गावांच्या विकासासाठी एकत्रित काम करू असेही ते म्हणाले. त्यांनी कृषी विभागाच्या काही महत्त्वाकांक्षी योजनांचीही यावेळी माहिती दिली.
पाणीदार महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करणार – आमिर खान
पाणीदार महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगून पाच वर्षांपूर्वी पाणी फाऊंडेशनने महाराष्ट्रात काम सुरू केले. आता या कामाचा अधिक गावात विस्तार न करता काही निवडक गावांमध्ये खोलवर जाऊन गाव समृद्धीचे काम करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच पाणी फाऊंडेशन सध्या फक्त 900 गावांत काम करत असल्याचे आमिर खान यांनी सांगितले.




























































