
मुंबईत कोरोना संपलेला नाही. त्यामुळे दुसरी लाट येणार नाही यासाठी सतर्क रहा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील शिवसेनेच्या आमदारांना दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी ठाणे व पालघरमधील आमदारांची बैठक झाली. आज ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर मुंबईतील शिवसेना आमदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या सूचना ऐकून घेतल्या.
मुंबईतील आमदारांनी रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांपासून पोलीस वसाहती, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर सूचना केल्या आणि धोरणात्मक विषय मांडले.
भांडुप, कांजूर आणि मुलुंड येथील खोतीच्या जमिनीचा प्रश्न आमदार सुनील राऊत यांनी मांडला. मोहम्मद युसूफ खोत आणि रतनसी करसनदास यांचे या भागात भूखंड असून खोतीची ही जमीन राज्य सरकारने ताब्यात घ्यावी आणि विकासासाठी ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांच्या मतदारसंघातील प्रश्न ऐकून घेतले. मुंबईतील म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास, महापालिकेच्या प्रकल्पातील विस्थापितांना त्याच भागात घरे देण्याच्या संदर्भातील हे सर्व धोरणात्मक विषय आहेत.
संबंधित अधिकाऱ्य़ांनी याबाबतीतचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. काही प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या विषयांवर अधिकाऱ्य़ांसोबत स्वतंत्र बैठका घेण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
नैसर्गिक आपत्तीच्या धर्तीवर रहिवाशांना मदत
मुंबईतल्या अनेक इमारतींचे बांधकाम रखडले आहे. काही विकासक परागंदा झाले आहेत तर काही विकासक आर्थिक अडचणीत आले आहेत. परिणामी एकीकडे इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे तर दुसरीकडे भाडेकरूंचे अनेक महिन्यांचे भाडे विकासकांनी थकवले आहे. त्यामुळे बहुसंख्य गरीब व मध्यमवर्गीय भाडेकरू हतबल झाले आहेत.
राज्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्तीग्रस्तांना मदत दिली जाते. ‘निसर्ग’ चक्रीवादळ व पूरग्रस्तांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली. त्याच धर्तीवर सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारने भाडेकरूंचे थकलेले भाडे द्यावे आणि कालांतराने विकासकाकडून हे भाडे वसूल करावे अशी सूचना आमदार सदा सरवणकर यांनी केली.
दादर-माहीमध्ये 27 इमारतींचा पुनर्विकास रखडल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. माहीममधील पोलीस वसाहतींचा पुनर्विकास करताना सध्या वास्तव्याला असलेल्या पोलिसांना मालकी तत्त्वाने घरे देण्यात यावीत. तसेच जाखादेवी मंदिराच्या शेजारील पालिकेच्या मोकळ्या भूखंडावर कोरोना हॉस्पिटल तातडीने उभारण्याची सूचनाही सदा सरवणकर यांनी केली.




























































