श्रीफळ

मीना आंबेरकर

आपल्या आहाराचा अविभाज्य भाग नारळ… आज नारळीपौर्णिमा…. पाहूया नारळाचे पदार्थ…

आपल्या मसालेदार सदरात आपण मसाल्यांचे अनेक प्रकार पाहिले. जवळजवळ सर्वच मसाल्यांमध्ये नारळ किंवा सुकं खोबरं हा पदार्थ असतोच असतो. नारळ किंवा सुकं खोबरं जसे मसाल्यात आपले स्थान राखून असतात त्याचप्रमाणे ताज्या मसाल्यात किंवा इतर खाद्यपदार्थांतही आपली हजेरी लावतात आणि खाद्यपदार्थांची चव वाढवतात. त्यामुळे आपल्या मसाल्यांतील हा घटक पदार्थ स्वतःच्या अस्तित्वाने एका सणाचेही प्रतिनिधित्व करतो. श्रावणात येणारी नारळी पौर्णिमा हा सण नारळाचे महात्म्य दाखवून देतो. त्या दिवशी नारळाचे एखादे पक्क्वान्न बनवल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. तर मग बघूया तर नारळाच्या काही खाद्य कृती.

bhaji-23

मिश्र फळांचा रस्सा 

साहित्य 1 टे. स्पून किसलेलं आलं, 2 मध्यम बारीक चिरलेले कांदे, 3 टे. स्पून बटर, 2 टी स्पून ठेचलेले धणे, 3 टी स्पून धणे, जिरे पावडर, 1 टी स्पून गव्हाचं पीठ, 2 टी स्पून लिंब रस, 2 टी स्पून ताजी केलेली मिरपूड, 3 वाटय़ा खवलेला ओला नारळ, 3 टे स्पून मलई, 1 टी स्पून साखर, 5 कप मिश्र फळांचे तुकडे (सफरचंद द्राक्ष, केळ, अंजीर, अलुबुरवार उपलब्ध असलेली फळं).

कृती नारळाचं घट्ट दूध काढून त्यात गव्हाचं पीठ कालवून ठेवा. सॉस पॅनमध्ये तेल तापलं की कांदा तांबूस परता व त्यावर आलं घालून परता. नंतर त्यात धणे-जिरे पूड, मिरपूड घाला. सर्व फळं घालून लिंबू रस, साखर व भरडलेले धणे घालून मंद आचेवर 2 वाफा आणा. नारळाचं दूध व मीठ घालून छोटी उकळी आणा. ताजी मलई घाला. भाताबरोबर सर्व्ह करा.

naralii-bhat-12

नारळी भात

साहित्य …2 वाटय़ा जुने आंबेमोहर तांदूळ, चार लवंगा, अर्धा इंच दालचिनी तुकडे करून दहा वेलदोडय़ांची पूड, 2 टे. स्पून बेदाणे, 1 मूठ काजू अगर बदामाचे काप, पाव टी स्पून केशर, दोन वाटय़ा ओलं खोबरं, तीन वाटय़ा चिरलेला गूळ अर्धी वाटी साजूक तूप, पाणी.

कृती…भात करण्यापूर्वी अर्धा तास तांदूळ निथळून ठेवावे. गॅसवरील अर्ध्या तुपात लवंगा, दालचिनीचे तुकडे, निथळलेले तांदूळ घालून चांगलं परतावं. त्यात तांदळाच्या अडीचपट गरम पाणी, एक चिमूट मीठ घालावं. ढवळून साध्या कुकरमध्ये पातेलं ठेवून भात शिजवावा. नंतर ओल्या परातीत भात उपसावा. ओलं खोबरं, गूळ एकत्र करून कव्हईच्या मोठय़ा पातेल्यात भरावं व मध्यम गॅसवर ठेवून सतत ढवळत राहावं. एक दोन कढ आल्यावर त्यात केशर, वेलची पूड, काजू तुकडा, बेदाणे व शिजलेला भात मोकळा करून घालावा व स्टीलच्या झाऱयाने ढवळत राहावं. आत मधला पाक आटला म्हणजे लगेच पातेलं खाली उतरवावं. नंतर वरील उरलेलं तूप भातावर पसरावं. मधून मधून जाता येता भात ढवळावं म्हणजे भात रवाळ होतो. साधारण थंड झाल्यावर उबेवर ठेवावा. गूळ-खोबऱयात भात घातल्यावर गॅसवर भात जास्त वेळ ढवळत राहू नये. तसा ठेवल्यास भाताची शितं आवळतात. गूळ चांगल्या प्रतीचा घ्यावा.

khobra-wadi

ओल्या खोबऱयाच्या वडय़ा

साहित्य…दोन मोठे नारळ, अर्धा किलो साखर, एक वाटी दूध, 1 टे. स्पून वलची पूड, केशरी रंग असल्यास चारोळय़ा.

कृती नारळ खवून घ्यावे. त्यात दूध व साखर मिसळून मंद गॅसवर सतत ढवळत राहावं. मिश्रण कडेनं कोरडं पडू लागलं म्हणजे त्यात वेलची पूड व केशरी रंग (थोडय़ा दुधात कालवून) घालावा आणि पातेलं खाली उतरावं. जरा घोटून तूप लावलेल्या चौकोनी ट्रेमध्ये जाडसर मिश्रण थापावं. असल्यास चारोळय़ा घालून परत अलगद थापावं. थोडय़ा वेळानं वडय़ा कापाव्या.

aape-3

नारळाच्या रसातळे आप्पे

साहित्य – दोन वाटय़ा बाजारी रवा, अर्धी वाटी पातळ पोहे, एक वाटी नारळाचे दूध, दीड वाटी पिठी साखर, पाव वाटी काजूचे तुकडे, 1 टे. स्पून बेदाणे, एक टी स्पून वेलची पूड, चिमूटभर सोडा, तूप, मीठ इ.

कृती – रव्याला 1 टे. स्पून पातळ तूप चोळून घ्या. नारळाच्या दुधात भिजवावा व एक तास तसाच ठेवावा. पोहे धुऊन ठेवावे. भिजवलेल्या रव्यामध्ये पोहे चुरडून घालावे. त्यातच पिठी साखर, काजूचे तुकडे, वेलची पूड, चवीसाठी मीठ घालावं. मिश्रण आवश्यक तेवढं पातळ होण्यासाठी त्यात थोडं दही घालावं व चिमूटभर सोडा घालून परत पेसावं. आप्पे पात्रात चमचाभर तूप घालून त्यात पाऊण वाटी भरेल एवढं मिश्रण घालावं. त्यावर पोकळ झाकण ठेवून लगेचच काढावं व कडेने तूप सोडावं. खालून गुलाबी रंगावर झाले म्हणजे आप्पे काढावेत.