हरवलेलं संगीत (भाग 5) : तकदीर का शिकवा कौन करे

>> शिरीष कणेकर

एकावन्न साली आलेल्या दिलीप कुमार – मधुबालाचा ‘तराना’ मी अकरा वर्षांनी बासष्टच्या सुमारास ग्रॅण्ट रोडच्या ‘न्यू रोशन’ नावाच्या खुराडय़ात प्रथम पाहिला. मला शक्य असतं तर तहानभूक विसरून त्याच खुर्चीत बसून मी तो लागोपाठ तीन ‘शोज’ना डोळे भरून पाहिला असता. दिलीप कुमार व मधुबाला यांना एकमेकांवर जीव तोडून प्रेम करताना पाहणे हा ‘कुंडलिनी’ जागरुक करणारा निस्सिम आनंद होता. त्या काळात मधुबाला दिलीप कुमारवर किती जीव टाकत होती हे कॅमेऱयापासूनही लपलं नव्हतं. ‘बेइमान तोरे नैनवा’ मधुबाला दिलीप कुमारच्या उशाशी बसून गाते व दिलीपकुमार पहुडल्या अवस्थेत तिच्याकडे जे बघतो ते बघण्यासाठी काही करून ‘तराना’ बघा. मी सांगतो म्हणून बघा.

सगळं छान होतं, पण कोणा पाप्याची नजर लागून चित्रपट चालला नाही. त्याच टीमनं पुन्हा कंबर कसली. पुन्हा नायक दिलीप कुमार, नायिका मधुबाला व संगीतकार अनिल विश्वास. चित्रपटाचं नाव ठरलं, ‘हारसिंगार’, पण तो चित्रपट निघालाच नाही. दिलीपकुमार – मधुबाला-अनिल विश्वास या तिघांवर कुठल्या तरी ग्रहाची वक्रदृष्टी असावी.

‘मशाल’च्या शूटिंगच्या दरम्यान दिलीप कुमार जाता येताना मला ओझरता भेटला. तेवढय़ात मी त्याला ‘हारसिंगार’ न बनण्याचे कारण विचारले.

‘‘मला कल्पना नाही.’’ दिलीप कुमार म्हणाला, ‘‘बट यू नो, मधुबाला वॉज देअर विथ मी.’’ त्यानं माझ्या खांद्यावर खुशीत गुद्दा मारला. पुढे कितीतरी दिवस तो दुखणारा खांदा दिलीप कुमारचा प्रसाद म्हणून मी मिरवीत होते.

हेच मी मधुबालाला विचारलं असतं तर तीही म्हणाली असती, ‘‘बट यू नो, दिलीप कुमार वॉज देअर विथ मी.’’ तिनं बोटानं माझ्या बरगडीत ढोसलं असतं तर काही महिने मी आंघोळीशिवाय राहिलो असतो.

‘हारसिंगार’ निघाला नाही तरी अनिल विश्वासनं आपलं काम चोख केलं. सर्व गाण्यांच्या सॅम्पल रेकॉर्डस् निघाल्या. त्या कोणाकडे असतील याबद्दल अनिलदा अनभिज्ञ होता. ‘तराना’पेक्षा चांगली गाणी झाली होती हे मात्र तो आवर्जून सांगायचा. माझा मित्र ‘संगीतवेडा शिनू’ या गाण्यांच्या ओढीत झपाटल्यासारखा झाला. जुन्या रेकॉर्डस् विकणारी दुकानं त्यानं पालथी घातली. पार साताऱयापर्यंत गेला. त्याच्या हाती काहीच लागले नाही. मग कुठून तरी त्याच्या कानावर आलं की, निर्माता-दिग्दर्शक महेश कौलकडे त्या सॅम्पल रेकॉर्डस् आहेत. शिनू कौलकडे जाऊन धडकला. सगळं ऐकून घेऊन कौल म्हणाला, ‘‘उशीर केलास. कित्येक वर्षे त्या रेकॉर्डस् माझ्याकडे माळय़ावर धूळ खात पडल्या होत्या. गेल्याच आठवडय़ात मी त्या फेकून दिल्या. सॉरी!’’

शिनू अक्षरशः रडला. त्या गाण्यांसाठी व ती ऐकणं नशिबात नसलेल्या रसिकांसाठी. त्यानं अनिलदाला गाठून ही कहाणी सांगितली. अनिलदानं शांतपणे ऐकून घेतलं व खांदे उडवून विषय संपवला, पण आम्ही नाही ना खांदे उडवू शकत! ‘तराना’पेक्षा भारी संगीत ऐकणं आमच्या किंवा कुणाच्याच भाळी नव्हतं. अमर संगीताची भ्रूणहत्या झाली…

एकाच वेळी ‘अनारकली’वर दोन चित्रपट निघत होते. एक बीना रॉय व सी. रामचंद्रचा ‘अनारकली’ व दुसरा मीना कुमारी व अनिल विश्वासचा ‘अनारकली’. सी. रामचंद्रचा ‘अनारकली’ पूर्ण होऊन झळकला व संगीताच्या बळावर गाजला. दुसरा ‘अनारकली’ पूर्णच झाला नाही. त्याचं नक्की किती शूटिंग झालं होतं कळायला मार्ग नाही. ते सांगू शकेल असं आता कोणीही नाही. ‘अनारकली’च्या गेट-अपमध्ये मीना कुमारी लांबून चालत येतेय, असा फिल्मचा एक धूसर तुकडा मी पाहिला होता. दॅटस ऑल!

‘अनारकली’ला भिंतीत चिनण्यात येते त्या क्लायमॅक्स सीनसाठी अनिलदानं लताच्या आवाजात एक अतिसुंदर गाणे रेकॉर्डदेखील केले होते (याच प्रसंगासाठी सी. रामचंद्रने ‘ये जिंदगी उसीकी है’ हे गाणे दिले होते.). अनिलदाच्या गाण्याचे शब्द होते ‘अल्लाह भी है, मल्लाह भी है, कश्ती है के डूबी जाती है’ (कवी कैफ भोपाली). सर्व काही आहे, पाठीशी परमेश्वर आहे, नावेला नावाडी आहे, पण माझी नाव मात्र बुडायची ती बुडतेच आहे. चित्रपट डब्यात गेल्यानं हे अर्थपूर्ण, दर्दभरे गीत बेवारशी झाले. अखेर ते ‘मान’ नामे एका चित्रपटात वापरून टाकण्यात आले. तेही नायिका चित्राच्या तोंडी नाही तर भिकारणीच्या तोंडी. ‘समशीरे मुहोब्बत क्या कहिये, रुकती भी नही चलती भी नही’ हा धारदार शाही शिकवा कपडे फाटलेल्या व हातात भिकेचा कटोरा घेतलेल्या भिकारणीच्या तोंडून ऐकताना तत्कालीन प्रेक्षकांना काय वाटलं असेल देव जाणे!

ओ. पी. नय्यरच्या ‘लेके पहेला पहेला प्यार’चे बाशिंगबळ मात्र मजबूत होतं. अनेक निर्मात्यांनी नाकारल्यावर अखेर राज खोसलानं ते स्वीकारले, पण ‘सी.आय.डी.’मध्ये रफी व शमशादचे द्वंद्वगीत नायक देव आनंद व नायिका शकीला यांच्या तेंडी न टाकता रस्त्यावर गाणी बजावणी करणाऱया शीला वाझ न श्याम (राज खोसलाचा सहाय्यक) यांच्यावर चित्रित करण्यात आले. ते गातात व देव आनंद जाकीट घालून मरीन ड्राइव्हवर नुसता चालतो. अख्खा ‘सी.आय.डी.’ एकवेळ विसराल. पण ‘लेके पहेला पहेला प्यार’ व देव आनंदचे ते स्टाइलबाज रुबाबात चालणं कसं विसराल?…

‘लेके पहेला पहेला प्यार’ची चाल ‘ओरिजिनल’ नव्हती हे वाचून तुम्हाला धक्काच बसेल. ‘नमस्ते’ चित्रपटातील ‘नेकटायवाले बाबू से मिला दे कोई रे’ या नौशादच्या धृपदातील दुसऱया ओळीवर ओ.पी.नं ‘जादूनगरी से आया है कोई जादूगर’ची चाल सहीसही बेतली होती. मी याबाबत ओ.पी.ला छेडले असता त्यानं चौर्यकर्म मान्य केलं व तो म्हणाला, ‘‘नौशादच्या व माझ्या दोघांच्याही चालीत काही दम नव्हता.’’

‘सुपरडुपर’ हिट् गाण्याचा निर्माता हे बोलतोय.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या