
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
प्रियंका गांधी यांच्या राजकीय पदार्पणामुळे व प्रकृतिअस्वास्थ्यामुळे सोनिया गांधी यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही यासंदर्भात सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम देत काँग्रेसने आज पुन्हा सोनिया गांधी यांची उमेदवारी जाहीर केली. सोनिया गांधी नेहरू घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून मैदानात उतरतील तर त्यांचे काँग्रेस अध्यक्ष असलेले चिरंजीव राहुल गांधी अमेठीतून लोकसभेची निवडणूक लढतील. यादीत प्रियंका गांधी यांच्या नावाचा समावेश नाही.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 15 उमेदवारांची पहिली यादी आज काँग्रेसने जाहीर केली. त्यात उत्तर प्रदेशच्या 11 तर गुजरातच्या 4 उमेदवारांचा समावेश आहे. यूपीतून माजी केंद्रीय मंत्र्यांचे त्रिकुट सलमान खुर्शीद, जितीन प्रसाद व आरपीएन सिंग हे अनुक्रमे फरुखाबाद, दौरहा व खुशीनगर येथून निवडणूक लढतील. तर माजी केंद्रीय मंत्री भरतसिंग सोलंकी गुजरातमधील आनंदमधून निवडणूक लढतील.

























































