सिद्धू पुन्हा पाकिस्तानात; सुषमा स्वराज, कॅप्टन अमरिंदर सिंहांचा नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेतल्यामुळे टीकेचा धनी ठरलेला माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा एकदा पाकिस्तानात पोहोचला आहे. बुधवारी होणाऱ्या डेरा बाबा नानक- करतारपूर साहिब कॉरिडॉरच्या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सिद्धू पाकिस्तानात गेला आहे. विशेष म्हणजे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी या सोहळ्याला जाण्यास नकार दिला असतानाही सिद्ध पाकिस्तानात गेला आहे.

पाकिस्तानात पोहोचल्यानंतर सिद्धू म्हणाला की, मी येथे बाबा गुरुनानक यांचा संदेशवाहक म्हणून आलो आहे. मी शांततेचा संदेश देण्यासाठी येथे आलो आहे. मला येथे येण्यापासून कोणत्याही केंद्रीय मंत्र्याने किंवा नेत्याने रोखले नाही. सर्वांना उलट माझा आत्मविश्वास वाढवला कारण येथे येण्यामागे कोणताही राजकीय उद्देश नसून धार्मिक आहे.

सिद्ध पुढे म्हणाला की, आपल्याला धर्माला राजकीय चष्म्यातून पाहणे बंद करायला हवे. जगात असा कोणता नेता आहे जो भक्तांना आपल्या धार्मिक स्थळांवर जाण्यापासून रोखतो. या कॉरिडॉरमुळे दोन्ही देशातील संबंध सुधारण्यास मदत होईल, असेही तो म्हणाला. तसेच मी पाकिस्तानात आल्याने काँग्रेसचे कोणतेही नुकसान होणार नाही, असेही सिद्धू म्हणाला.

मुख्यमंत्री अमरिंदर यांचा नकार
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कॉरिडॉरच्या उद्घाटनासाठी निमंत्रण दिले होते. परंतु त्यांनी हे निमंत्रण धुडकावून लावत पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला. पंजाबमध्ये एकीकडे दहशतवादी हल्ले सुरू आहे, पाकिस्तानी सैन्य हिंदुस्थानी जवानांना सीमेवर लक्ष्य करत आहे, त्यामुळे पाकिस्तानमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही, असे अमरिंदर सिंह म्हणाले होते.