
राजकीय दृष्ट्या देशातील वातावरण, पाच राज्याच्या विधानसभांचे निकाल आणि INDIA गटातील मित्रपक्षांच्या ठाम भूमिकांनंतर आता काँग्रेसने अखेर जागावाटपाचा वाद मिटवण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे नेते देशभरातील जागावाटप आणि समायोजनासाठी मित्रपक्षांशी संपर्क साधत आहेत. ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांनी विविध विरोधी पक्षांच्या प्रमुखांना फोन केला आहे. गरज भासल्यास काँग्रेस त्या त्या राज्यांमध्ये जाऊन विरोधी पक्षांच्या नेत्यांचीही भेट घेणार आहे.
14 जानेवारीपासून सुरू होणार्या राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पुढच्या टप्प्यापूर्वी जागावाटप कराराला अंतिम स्वरूप देण्याची पक्षाला आशा आहे. मणिपूर-ते-मुंबई पदयात्रा सुरू होताच प्रचाराला सुरुवात करण्याचा विचार आहे.
त्यादृष्टीने उमेदवारांची यादीही उशिरा ऐवजी लवकर निश्चित होण्याची अपेक्षा असल्याचं बोललं जात आहे.
दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात आज संध्याकाळी झालेल्या बैठकीत काँग्रेसने हा निर्णय घेतला. पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी दुसरी बैठक झाली, जिथे राहुल गांधींव्यतिरिक्त मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखालील जागा वाटप समितीही उपस्थित होती. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि भूपेश बघेल हे जागावाटप समितीचे सदस्य आहेत.
जागावाटपाचा मार्ग खडतर असण्याची अपेक्षा आहे, विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आधीच आपापल्या भूमिका निश्चित आणि स्पष्ट शब्दात मांडल्या आहेत.
यादरम्यान, ‘INDIA आघाडी संपूर्ण हिंदुस्थानात असेल आणि बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर लढेल. बंगालमध्ये फक्त तृणमूल काँग्रेसच भाजपला धडा शिकवू शकते. ती संपूर्ण देशाला विजयाचा मार्ग दाखवू शकते’, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नेते खासदार संजय राऊत यांनी देखील महाराष्ट्रातील जागेंच्या संदर्भात ठाम भूमिका मांडली होती.
‘हा महाराष्ट्र आहे, आणि शिवसेना हा इथला सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही नेहमीच म्हणत आलो की शिवसेना दादरा आणि नगर हवेलीसह लोकसभा निवडणुकीत 23 जागांवर लढत आली आहे आणि तीच भूमिका आताही असेल’, असं संजय राऊत म्हणाले होते.





















































