काँग्रेस कार्यकारिणीने पक्षाचे खासदार राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करावी, असा ठराव मंजूर केला, अशी माहिती सूत्रांनी आज दिली. राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाडमधून लोकसभा निवडणूक जिंकली आहे.
काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) च्या बैठकीनंतर, काँग्रेस खासदार कुमारी सेलजा म्हणाल्या, ‘विजयानंतर राहुल गांधी यांची लोकसभेत विरोधी पक्षनेते पदी निवड व्हावी अशी CWCची इच्छा होती…’
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अलप्पुझा येथील नवनिर्वाचित खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले, ‘CWCने एकमताने राहुल गांधी जी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली’.
CWC ठरावात राहुल गांधींनी निवडणूक प्रचारात केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
‘काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रामुख्याने भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रेचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांचे विचार आणि व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करणाऱ्या या दोन्ही यात्रा आमच्या देशाच्या राजकारणाला ऐतिहासिक वळण देणाऱ्या घटना ठरल्या आणि त्यांनी देशवासीयांच्या आशा जागवल्या. 2024 च्या निवडणुकीत त्यांनी आपल्या प्रजासत्ताक संविधानाच्या संरक्षणाला केंद्रस्थानी ठेवलं. पाचन्याय-पचीस हमी कार्यक्रम यांची निवडणूक प्रचारात खूप चर्चा झाली तो राहुलजींच्या यात्रांचा परिणाम होता ज्यात त्यांनी सर्व लोकांच्या, विशेषतः तरुण, महिला, शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक यांच्या भिती, चिंता आणि आकांक्षांचे प्रतिबिंब पाहायला मिळाले’, असं त्यात म्हटलं आहे.
विस्तारित काँग्रेस कार्यकारिणीची बैठक शनिवारी राष्ट्रीय राजधानीत पार पडली. या बैठकीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, मनीष तिवारी, डीके शिवकुमार आणि रेवंत रेड्डी आदी उपस्थित होते.
CWC बैठकीनंतर बोलताना काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी म्हणाले, ‘नक्कीच त्यांनी (राहुल गांधी) (लोकसभेत विरोधीपक्षनेते) बनले पाहिजे. ही आमच्या कार्य समितीची विनंती होती. ते निडर आणि धैर्यवान आहेत’.
लोकसभा निवडणुकीनंतर, काँग्रेस निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला आहे आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची संख्या 52 वरून 100 वर पोहोचली आहे.