बांधकाम विभागाचा कारकून ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

शेतजमिनीला बिगरशेती (एन. ए.) करण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागणाऱया येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कारकुनाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी रंगेहाथ अटक केली.

पंढरपूर बांधकाम विभागातील भांडार कारकून चंद्रकांत अभिमन्यू टोणपे (वय 58) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

तक्रारदाराने 13 जून रोजी व्यवसायासाठी आपल्या शेतजमिनीस बिगर शेती ना हरकत (एन. ए.) प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज केला होता. याप्रकरणी टोणपे यांनी या कामासाठी स्वतःसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 15 हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली. तसेच, ठरलेल्या रकमेपैकी पाच हजार रुपये टोणपे याला दिले. उर्वरित लाच घेण्यासाठी टोणपे ठाकरे चौक येथे आला असता, लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ अटक केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सोलापूर येथील पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार प्रमोद पकाले, सलीम मुल्ला, उमेश पवार, शामा सुरवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.