शाळा आणि महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना ई-सिगारेटचा विळखा, सी.बी. कंट्रोल पथकाच्या शहरात धडक कारवाया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये हानिकारक असलेल्या ई-सिगारेटचे सेवन करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. स्टाइल तसेच कधीही आणि कुठेही पिता येणारी असून त्याचा वासदेखील येत नसल्याने तरुणांबरोबर अल्पवयीन मुलामुलींना ई-सिगारेटचा विळखा पडू लागला आहे. याची गंभीर दखल घेत सी.बी. कंट्रोल पथकाने शहरात 14 ठिकाणी छापा टाकून ई-सिगारेट विकणाऱया 11 विक्रेत्यांना बेडय़ा ठोकल्या आहेत.

ई-सिगारेटची मागणी आणि त्यामुळे मुलामुलींमध्ये होणाऱया दुष्परिणामाची दाहकता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ऑनलाइन तसेच दुकांनामध्ये सर्रासपणे ई-सिगारेट विकली जात असून त्याचे प्रमाण वाढू लागले आहे. अल्पवयीन मुले बिनधास्त ई- सिगारेटचे सेवन करू लागल्याने याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात ई-सिगारेटची विक्री करणाऱयांना आपल्या रडारवर आणले. मग सी. बी. कंट्रोल पथकाचे प्रभारी निरीक्षक नितीन पाटील, एपीआय रोहित सावंत, रूपेश दरेकर तसेच महेश नाईक, गणेश डोईफोडे, चंद्रकांत वलेकर, महेंद्र दरेकर, शेखर भंडारी, विशाल यादव, रोहन शेंडगे, पवार, मगर, खारवी आदींची 12 पथके तयार करून धाडी टाकण्यात आल्या.

या कारवाईदरम्यान तीन ठिकाणी धक्कादायक बाब दिसून आली. एमआरए मार्ग, ताडदेव आणि खार येथील दुकानात अल्पवयीन मुलांना ई-सिगारेट विकताना विक्रेत्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. नैराश्य व हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतानाही केवळ स्टाइल तसेच वास येत नाही. शिवाय माचिस, लायटरची आवश्यकता नसल्याने व केव्हाही झुरका मारता येत असल्याने ई-सिगारेट पिण्याचे फॅड वाढू लागल्याचे सांगण्यात येते.

– क्रॉफर्ड मार्केट, नागपाडा, हिरा पन्ना, पाली हिल, लिंकस्क्वेअर मॉल, पाली नाका, लोखंडवाला, मालाड अशा 12 ठिकाणी गुरुवारी छापेमारी केली. या ठिकाणी 2030 ई-सिगारेट, हुक्का फ्लेव्हरचे 963 बॉक्समधील 120 किलो सुगंधित तंबाखू, रिफिलिंग लिक्विडच्या 53 बॉटल्स (2200 मिली) असा 14 लाख 60 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच ई-सिगारेटचा गोरखधंदा करणाऱया 11 विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या. पुढील कारवाईसाठी त्या सर्वांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.