
जगभरात कोरोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. जर्मनी, फ्रान्स, रशियासह युरोपातील अनेक देशांमध्ये विषाणूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. इतकेच नव्हे, बऱ्य़ापैकी लसीकरण होऊनही ब्रिटनमध्ये चौथी आणि फ्रान्समध्ये पाचवी लाट धडकली असून कोरोनाचा नव्याने झालेला हा उद्रेक कसा रोखायचा, असा यक्षप्रश्न अनेक देशांपुढे उभा ठाकला आहे.
फ्रान्सचे आरोग्य मंत्री ओलीवर वेरन यांनी देशात कोरोनाच्या पाचव्या लाटेची सुरुवात झाल्याचे जाहीर करतानाच संसर्गाबाबत गंभीर इशारा दिला आहे. पाचव्या लाटेत कोरोना संसर्ग वेगाने पसरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोना लवकरच पूर्णपणे नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दावे केले जात असतानाच फ्रान्सच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या या माहितीमुळे जगाची चिंता वाढली आहे. याच वेळी ब्रिटनमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने थैमान घातले आहे. जर्मनीतही कोरोना पुन्हा बळावला असून गेल्या 24 तासांत 50 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. युरोपसह मध्य आशियातील अनेक देशांमध्ये रुग्ण संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे.
डेल्टा ठरतोय चिंतेचे कारण
हिंदुस्थानात कोरोनाची दुसरी रूपे (म्युटेशन) गायब होऊ लागली आहेत. मात्र याच वेळी पुन्हा बाधित करणारा डेल्टा किंवा यासंबंधित अन्य म्युटेशन सध्या चिंतेचे कारण बनले आहेत. कोरोना महामारी पुन्हा फैलावण्याची क्षमता डेल्टा विषाणूमध्ये आहे, असा दावा नवी दिल्लीतील इन्स्टिटय़ूट ऑफ जिनोमिक्स अॅण्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे (आयजीआयबी) संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी केला आहे.
डब्ल्यूएचओने दिला होता सावधगिरीचा इशारा
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) गेल्याच आठवड्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याबाबत सावधगिरीचा इशारा दिला होता. महामारीचा पुन्हा उद्रेक होण्याची स्थिती आहे. या वेळीही युरोपच महामारीच्या केंद्रस्थानी आहे. जगभरात नोंद होत असलेल्या सर्व नव्या रुग्णांमध्ये निम्म्याहून अधिक रुग्ण हे युरोपीय देशांतील आहेत, असे निरीक्षण ‘रॉयटर्स’ने नोंदवले आहे.




























































