चीनवर पुन्हा ‘कोरोना अटॅक’; मॉल, सोसायटय़ा सील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूने चीनवर पुन्हा हल्ला करून देशाला बेजार करून सोडले आहे. रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ झाल्यानंतर चिंतेत सापडलेल्या प्रशासनाने मॉल्स आणि हाऊसिंग सोसायटय़ा सील करण्याचा धडाका सुरू केला आहे. बीजिंगच्या डोंगचेंगमधील रॅफल्स सिटी मॉलमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर मॉल सील करून परिसरात कोरोनाच्या चाचण्या वाढवल्या आहेत.

ज्या भागात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत, त्या भागात लॉकडाऊन करून लोकांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी मध्य बीजिंगमधील चाओयांग आणि हैदियान जिह्यांमध्ये नवीन सहा रुग्णांची नोंद झाली. ईशान्य जिलिन प्रांतात कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्या इतरांची तपासणी केली जात आहे. डोंगचेंगमधील रॅफल्स सिटी मॉल सील करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी मॉलमधील एकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने चिनी अधिकाऱयांना धडकी भरली आहे.

  • बीजिंगमध्ये 40 वर्षांपासून सुरू असलेली मॅरेथॉन शर्यत रद्द केली आहे. चीनमधील हा सर्वात मोठा खेळ आहे. कोरोना संसर्ग पसरण्याच्या भीतीने आयोजकांनी ही मॅरेथॉन रद्द केली आहे.
  • कोरोना चाचणी वाढवली आहे. एका शहरातून दुसर्या शहरात जाण्यावर बंदी घातली आहे.
  • हिवाळी ऑलिम्पिक पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. कोरोनाकाळात ही स्पर्धा आयोजित करणे चीनसाठी मोठे आव्हान आहे.
  • 40 लाख लोकसंख्येच्या लांझो शहरात लॉकडाउन लागू केले आहे. इनर मंगोलियातील आयजिन काउंटीमधील लोकांनाही घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे.

ब्रिटनमध्ये पाळीव कुत्र्यालाही कोरोना

लंडन ः जगातील अनेक देश अजूनही कोरोना विषाणूच्या संसर्गाशी लढा देत आहेत. अशातच ब्रिटनमध्ये एक पाळीव कुत्रा कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने विषाणूसंबंधी चिंतेत नवीन भर पडली आहे. या कुत्र्याला त्याच्या मालकापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यासंदर्भातील वैद्यकीय पुराव्यांचा शोध घेऊन पुढील निष्कर्ष काढण्यात येणार आहेत. वेब्रिज येथील प्राणी व वनस्पती आरोग्य संस्थेच्या प्रयोगशाळेत 3 नोव्हेंबरला या कुत्र्याच्या वैद्यकीय चाचण्या केल्या होत्या. त्या चाचण्यांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्यात तो कुत्रा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यापूर्वी या कुत्र्याच्या मालकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मालकापासूनच कुत्र्याला कोरोना संसर्ग झाल्याची दाट शक्यता आहे.