
कोरोना वेगाने पसरत असल्याचे समोर येत असताना नागरिक मात्र नियम पाळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पालिकने नियमांच्या कठोर अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. यानुसार उद्या सोमवारी कठोर नियमांची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. याबाबतचा कृती आराखडा तयार असल्याचेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले असून उद्या 19 एप्रिल रोजी नवा कृती आराखडा जाहीर करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आणखी काय उपाययोजना कराव्यात याचा आराखडा तयार केला जात असून सोमवारी तो जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईत आटोक्यात आलेल्या कोरोनाने फेब्रुवारी 2021मध्ये पुन्हा एकदा वेगाने पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिका योग्य त्या उपाययोजना राबवत आहे.
देशातून मुंबईत येणाऱया प्रवाशांची संख्या मोठय़ा प्रमाणावर असून आता पुन्हा एकदा मुंबईत येणाऱया प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. विनामास्क फिरणाऱयांकडून सध्या 200 रुपये दंड आकारण्यात येतो, तो वाढवणे शक्य होईल का, क्वारंटाईनचे नियम अधिक सक्त करणे अशा विविध मुद्दय़ांवर चर्चा सुरू आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आणखी काय उपाययोजना कराव्यात याचा आराखडा तयार केला जात असून सोमवारी तो जाहीर करण्यात येईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
विनामास्क कारवाई आणखी तीव्र होणार
मुंबईत सध्या 10 हजारांच्या घरात रुग्ण आढळत असून रोज 50 रुग्ण दगावत आहेत. रोज वाढणारी रुग्ण संख्या ही चाचण्यांची क्षमता वाढवल्याने दिसत असली तरी मुंबईसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे.
मुंबईच्या प्रवेशद्वारावर कोरोना चाचणी केंद्र उभारणे शक्य नाही. त्यामुळे मुंबईत प्रवेश करण्याआधीच राज्य सरकारच्या अखत्यारीतील आरोग्य कर्मचारी ठिकठिकाणी तैनात असून चाचणी करत आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाने एसटी आगार, रेल्वे स्थानके, विमानतळ या ठिकाणी पुन्हा एकदा लक्ष केंद्रीत केल्याचे त्यांनी सांगितले.





























































