कोरोनामुळे बॉलीवूडकरांच्या लाइफस्टाइलला फटका! कुणी सुरक्षेत कपात केली तर कुणी प्रॉपर्टी विकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एरव्ही ग्लॅमरमुळे चमचमणाऱया बॉलीवूड इंडस्ट्रीला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कलाकारांच्या लाइफस्टाइलवरही याचे परिणाम झाले आहेत. काही कलाकारांना आपल्या सुरक्षेत कपात करावी लागली आहे तर काही कलाकारांवर आपली आलिशान लाईफ स्टाईल जपण्यासाठी प्रॉपर्टी विकायची वेळ आली आहे. कोरोनामुळे कमाईचे इतर पर्याय बंद झाल्याने शेअर मार्पेट, म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसारखे पर्यायदेखील कलाकारांनी निवडले आहेत.

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटामुळे सगळेच बेजार झाले आहेत. काही बडे कलाकार सोडले तर बॉलीवूडलाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. यावर्षी तरी कोरोनाचे संकट दूर होईल, अशी बॉलीवूडकरांना आशा होती. मात्र मार्चनंतर कोरोनाचा कहर पुन्हा वाढू लागल्याने अनेक निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. एका ज्येष्ठ अभिनेत्याने सांगितलेय, मोठे कलाकार डिप्रेशनमध्ये आहेत तर छोटय़ा कलाकारांना कमाईची चिंता सतावतेय. सगळचं गणित विस्कटलंय. काही कलाकारांवर प्रॉपर्टी विकायची वेळ आलीय तर काही छोटे कलाकार आपल्या गावी परतले आहेत.

कोरोनामुळे 2020 या वर्षात केवळ 441 चित्रपट प्रदर्शित झाल्याने थिएटरमधून मिळणारे उत्त्पन्नात 80 टक्के घट झाली. फिक्कीच्या अहवालानुसार, गतवर्षी मनोरंजनसृष्टीची एकूण कमाई 24 टक्क्यांनी घटली आहे.
रेड कार्पेट सोहळ्यात सगळ्यांचे लक्ष वेधतात ते त्यांचे डिझायनर कपडे. वर्षभरापासून रेड कार्पेट सोहळे बंद असल्याने बहुतेक कलाकारांनी डिझायनर कपडय़ांकडे पाठ फिरवली आहे. परिणामी ड्रेस डिझायनर्सना आपला स्टुडिओ चालवणे कठीण झाले आहे.

एका चित्रपट व्यापार विश्लेषकाच्या माहितीनुसार, बडे कलाकार चित्रपटासाठी कॉन्ट्रक्ट करताना 25 टक्के अॅडव्हान्स पैसे घेतात. बाकी 70 टक्के इंडस्ट्रीतील कलाकार, तंत्रज्ञांना रोजच्या कामानुसार पैसे दिले जातात. डेली बेसवर काम करणाऱयांचे कोरोना संकटामुळे जगणे मुश्कील झाले आहे.