
कोरेनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्यतज्ञांच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारने नाईलाजाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. इतर पर्याय उपलब्ध नसल्याने जनतेच्या जीवितासाठी, सुरक्षिततेसाठी काही अपरिहार्य निर्णय घ्यावे लागत असल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कोरोना निर्बंधांचे पालन करून सहकार्य करा, असे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाच्या भयावह स्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत कोरोना विरोधातील लढाईत सहकार्य करण्याचे आवाहन सर्वांना केले. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येची आकडेवारी सर्वांसमोर मांडत राज्यातील गंभीर स्थितीची जाणीव त्यांनी करून दिली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा दिल्यास सामूहिक प्रयत्नांतून कोरोनावर निश्चित मात करता येईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
राज्यातील आरोग्य यंत्रणेचे सगळे घटक त्यामध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी हे अहोरात्र कष्ट करत आहेत. अहोरात्र कष्ट करून ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रुग्णांसाठी बेडस्, वैद्यकीय उपकरणं आणि इतर पायाभूत सुविधा यांचादेखील प्रचंड ताण आलेला आहे. त्यामुळे नाइलाजाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध लागू करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाची गंभीर व भयावह स्थिती लक्षात घेता या स्थितीला धैर्याने, सामूहिकपणाने आपण सामोरे गेलेच पाहिजे, आता त्याला पर्याय राहिलेला नाही. समाजातील सर्व घटकांना, कष्टकरी, शेतकरी, व्यापारी व अन्य घटकांना विनंती आहे की, आपणाला वास्तव नाकारून चालणार नाही.
सामूहिक प्रयत्नांतून मार्ग निघेल
कोरोनाच्या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करतेय, त्याचप्रमाणे केंद्रसुद्धा या संकटातून राज्याला मदत करण्यासाठी पूर्णपणे सहकार्याची भूमिका घेत आहे. कालच देशाच्या आरोग्यमंत्र्यांशी संपर्क साधला. ज्या कमतरता आहेत याबाबत चर्चा केली. त्यांनी या सर्व संकटात केंद्र सरकार व आरोग्य खाते पूर्णशक्तीने सर्व राज्यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्र सरकारच्याही पाठीशी असल्याचे सांगितले आहे. त्यांची मदत व आपल्या सर्वांचा सामूहिक प्रयत्नांतून निश्चित मार्ग निघेल, असे पवार म्हणाले.
- बंधने आणली की साहजिकच अस्वस्थता येते. शेतकरी, कामगार, नोकरदार, हमाल, व्यापारी, व्यावसायिक, कष्टकरी अशा समाजातील प्रत्येक घटकांना या संकटामुळे फार मोठी झळ बसली आहे.
- व्यवसाय, दुकाने बंद झाल्याने व्यापारी वर्गाचे नुकसान झाले आहे. फळभाज्यांसारख्या नाशवंत शेतीमाल तयार करणाऱया शेतकऱयाला आपल्या मालाचं करायचं काय? विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- शेतीवर्गाचेदेखील अपरिमित नुकसान होत आहे. या सगळ्यातून पुढे जात आहोत, परंतु पुढे जात असताना यातून यशाचा मार्ग काढायचा असेल, यश सिद्धीला न्यायचं असेल तर या सगळ्या स्थितीला तोंड द्यावे लागणार आहे.






























































