
कोरोनामुळे जगभरातील सर्व व्यवहार काही काळ ठप्पच झाले होते. याचा सर्वाधिक फटका व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना बसला असून अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्डस् ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2019 शी तुलना केली असता 2020 मध्ये शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या अधिक घटना घडल्या आहेत. 2020 मध्ये 11 हजार 677 व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात 4356 छोटय़ा व्यापाऱ्यांच्या आणि 4226 दुकानदारांचा समावेश आहे. व्यावसायिक क्षेत्रातील आत्महत्यांच्या प्रमाणात 29 टक्क्यांनी वाढ झाली असून संपूर्ण देशात आत्महत्येच्या प्रमाणात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत शेतीचे नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरीच सर्वाधिक आत्महत्या करतात असे आकडेवारी सांगत होती. मात्र कोरोनामुळे व्यावसायिकसुद्धा मानसिक तणावाखाली असल्याचे सिद्ध झाले आहे.

























































