
चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रानं सावध होत आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी विमानतळांवर कोविड-19 तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
परदेशातून आलेल्यांचे रँडम नमुने गोळाकरून कोरोनाव्हायरससाठी तपासले जातील, असे आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी बुधवारी सांगितल्याचे इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटले आहे. चीनमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावर चाचणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एबीपी वृत्तवाहिनीने हे आरोग्य मंत्रालयाचा हवाला देत वृत्त प्रसिद्ध केले आहे.
देशात सध्या कोरोनाचे 10 वेगवेगळे व्हेरिएंट आहेत, नवीन व्हेरिएंट BF7 आहे. सध्या देशात फक्त Omicron चे वेगवेगळे प्रकार पसरत आहेत. आजही डेल्टा व्हेरियंट देशात आढळताना दिसत आहे’, असे सूत्रांनी सांगितल्याचे इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, याआधी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील कोविड परिस्थितीवर उच्च अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक घेतली.
‘कोविड अजून संपलेला नाही. मी सर्व संबंधितांना सतर्क राहण्याचे आणि नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यास तयार आहोत’, असे त्यांनी ट्विट केले.


























































