Corona Update गेल्या 24 तासांत 10,112 नवीन रूग्णांची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोना रूग्णांचा आलेख वाढताच असून गेल्या 24 तासांत 10 हजार 112 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सक्रिय रूग्णांची संख्या 67 हजार 806 वर पोहोचली आहे. तर तब्बल 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासात एकूण 1 लाख 43 हजार 899 चाचण्या झाल्या असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तर 9 हजार 833 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत 5 लाख 31 हजार 329 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 22 एप्रिल रोजी देशात 24 तासांमध्ये 12 हजार 193 प्रकरणे नोदंविली गेली होती. तर त्या 20 एप्रिलला 12 हजार 591 रूग्णांची नोंद झाली होती. दरम्यान, कोरोनापासून मुक्त झालेल्यांची संख्या 4 कोटी 42 लाख 92 हजार 854 झाली आहे. तसेच आत्तापर्यंत अँटी कोविड लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.

मुंबईत कोरोनाने घेतला दोघांचा बळी

मुंबईत गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 1685 चाचण्यांमध्ये 177 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, तर कोरोनामुळे दोघांना जीव गमवावा लागला आहे. नव्या बाधितांमधील 20 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील सहा जणांना ऑक्सिजनची गरज लागली. तर एकाच दिवसात 264 जणांनी कोरोनावर मात केली. मात्र नव्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या 1377 झाली.

राज्यात चार जण दगावले
राज्यात गेल्या 24 तासांत 850 कोरोनाबाधित आढळले असून चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर 648 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र नव्या रुग्णांमुळे कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 6167 झाली आहे.